जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सफरचंदाचा ट्रक पेटवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian-army-jawan-in-jk

जम्मू-कश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला केला असून सफरचंदाने भरलेला ट्रक पेटवला. यात सुदैवाने कसलीही हानि झालेली नाही. घटनास्थळावर उपस्थित असेल्या नागरिकांनी व इतर व्यापाऱ्यांनी लगेचच ही आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेल्या दहशतवाद्यांनी व्यवसायिकांना आणि नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी शोपिया जिल्ह्यात सफरचंदाची बाग पेटवली आणि बागेत काम करणाऱ्या मजुरांनीही धमकावून पळवून लावले. या घटनेनंतर जम्मू-कश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दहशतवाद्यांनी सफरचंद बागमालकांना धमकावण्यास सुरुवात केल्याने सफरचंद बागमालकांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. यामुळे दहशतवादी अधिक आक्रमक झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर शोपियातील एका गावात दहशतवाद्यांनी सफरचंदांची बाग पेटवली. बागेत ठेवलेले सफरचंदाचे 70 बॉक्सही यावेळी दहशतवाद्यांनी पेटवले. बागमालक सफरचंद विकण्यासाठी बाजारात जात असतानाच दहशतवाद्यांनी बाग पेटवली होती.

कश्मीरमध्ये 72 दिवसांनंतर पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू झाली. पण त्यानंतर लगेचच दहशतवादी सक्रीय झाले आहेत. सोमवारी त्यांनी शोपिया जिल्हय़ातील सफरचंद घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचालकाची गोळय़ा झाडून हत्या केली होती. कश्मीर खोऱ्यात केंद्र सरकारने काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे  जनजीवन पूर्ववत होत आहेत. यात व्यापारी, स्थानिक दुकानदार, पर्यटन व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होत आहे. यामुळे दहशतवादी संतापले आहेत. त्यातूनच दहशतवाद्यांनी आता सफरचंद बाग मालकांना आणि त्याची ने-आण करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.