>> गीता हरवंदे
विद्यादान सहाय्यक मंडळ ही आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठाण्यातील संस्था. भाऊ नानिवडेकर याच्या विद्यादानाच्या संकल्पातून आकारास आलेल्या संस्थेकडून आजमितीस 300 पेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यात आले आहे. केवळ आर्थिक साहाय्य हेच उद्दिष्ट न ठेवता या मुलांनी शिक्षणाकडे वळावं आणि उज्ज्वल भविष्याकडे त्यांची वाटचाल व्हावी यासाठी संस्था कायम प्रयत्नशील असते.
काही दिवसांपूर्वी ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ या संस्थेच्या वार्षिक सभेला जाण्याचा योग आला. त्यांचं पत्रक आणि सभेतील वृत्तांत ऐकून माझी उत्सुकता वाढली. संपूर्ण सभेत उच्चशिक्षितांचा वावर लक्ष वेधून घेत होता. त्यांच्यासोबत वावरणाऱया आदिवासी विद्यार्थ्यांचा विरोधाभासही अचंबित करत होता. त्यातूनच कळलं की, या संस्थेचे सारे 300 कार्यकर्ते हे विनामोबदला अत्यंत नियोजनबद्ध कार्य करीत आहेत आणि म्हणून त्याची दखल घ्यावीशी वाटते.
ठाण्यातील सद्गृहस्थ भाऊ नानिवडेकर हे या ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ संस्थेचे संस्थापक सदस्य. समाजसेवेच्या उद्देशाने ते एकेदिवशी बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले. बाबा त्यांना म्हणाले, एवढय़ा लांब येण्यापेक्षा तुम्ही तुमच्या परिसरातील गरीबांसाठी काम करा. मग भाऊंना ते पटलं. त्यांनी शांतपणे विचारांती निर्णय घेतला की, आपण समाजातील असंख्य मुलांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. अशांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तशी सुरुवात भाऊंनी मुरबाड आणि शहापूर तालुक्यातून केली. घरोघरी जाऊन भाऊंनी होतकरू मुलांचा शोध घेतला. त्यांच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन सांगितलं की, आम्ही तुमच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करू. ती जिथे शिकताहेत तिथेच शिकू देत आणि त्यांना हवं तेवढं शिकू देत. ठाण्यातील आमची संस्था मदत करील.
अशा प्रकारे भाऊंनी या कार्याची सुरुवात 2008 मध्ये 23 विद्यार्थ्यांनी केली. आजमितीस 317 विद्यार्थी या संस्थेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात या संस्थेच्या सहा शाखा आहेत. संस्थेत 300 स्वयंसेवक विनामोबदला काम करीत आहेत तर शिकून नोकरीधंदा करणारे तीनशे माजी विद्यार्थीही कृतज्ञभावनेने काम करीत आहेत.
इमारत वरून आकर्षक दिसली तरी मजबुतीसाठी खोलवर खणावं लागतं. तद्वत विद्यादानच्या कार्यकर्त्यांना अशिक्षित-आदिवासी वस्तीत-पाडय़ांमध्ये फिरताना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. मुळात अशा गाव-वस्तीतल्या लोकांच्या समस्या शहरी लोकांपेक्षा वेगळय़ा असतात. पाणी, वीजसारख्या मूलभूत गरजासुद्धा त्यांना मिळत नाहीत तर शिक्षणाचा विचार करायला फुरसत कोठून असणार? अशा अवस्थेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या या समस्येत लक्ष घातलं आणि त्यातूनच हळुवारपणे त्यांच्या गळी उतरवलं की, या साऱया समस्या तुम्ही शिक्षणाअभावी पिढय़ान् पिढय़ा भोगताहात. तोपर्यंत गावागावातील सभेला भरपूर गर्दी होत असे, पण कार्यकर्त्यांचा जो मूळ उद्देश होता शिक्षणाचा, त्याला फार कमी प्रतिसाद मिळत होता. कार्यकर्त्यांनसुद्धा अशा प्रत्यक्ष भेटीतून अनेक गोष्टी शिकता आल्या – ‘उपाशी पोटी अध्यात्म पचत नाही.’
विद्यादान संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं जातं. अगदीच वेळ पडली तर ते पालक विद्यार्थ्याला आपल्या घरीही नेतात. जेणेकरून त्याच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये. काही विद्यार्थ्यांना राहण्या-खाण्याचीही सोय केली जाते. संस्थेची ‘हॉस्टेल कमिटी’ हे सर्व काम पाहते.
बहुतांश सारे विद्यार्थी मातीचे गोळे असतात. त्यांना अनेक प्रकारे घडवावं लागतं. त्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. कुठच्या विषयाचा कसा अभ्यास करायचा, कसं बोलायचं, मुलाखती कशा द्यायच्या, इंग्रजी संभाषण इत्यादींच्या कार्यशाळा घेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ बोलावले जातात किंवा कार्यकर्ते ते काम करीत असतात. कारण जवळपास सारे कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात तज्ञ किंवा उच्च पदावर आहेत.
संस्थेच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी दुसरं वैशिष्टय़ म्हणजे येथे जात, धर्म, पंथ पाहिला जात नाही तर दुर्बल घटक, गरजू आणि लायक विद्यार्थी पाहून देशासाठी सुजाण व उत्तम नागरिक घडवणं हे संस्थेचं उद्दिष्ट आहे. अनेक मुस्लिम मुलं-मुली संस्थेतर्फे शिकत आहेत. एवढचं नव्हे तर राज्याबाहेरील बिहारमधून आलेली एक मुलगी जी शीव रुग्णालयात एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे तिलासुद्धा संस्था मदत करीत आहे. परराज्यातील कोटय़ामधून तिला प्रवेश मिळाला होता.
आणखी एक लक्ष वेधून घेणार कार्यक्रम म्हणजे दरवर्षी विद्यार्थ्यांचं श्रमदान शिबीर घेतलं जातं. त्यासाठी विद्यार्थ्यांना आनंदवनातील सोमनाथला नेलं जातं. शिबीर आठवडाभराचं असतं. श्रमदानाचं महत्त्व तर कळतंच, पण तो एक आनंद मेळावा ठरतो मुलांसाठी.
महाराष्ट्रातील 230 गावं, सर्व जिल्हय़ांतील विद्यार्थी या संस्थेतर्फे शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत पाचशे मुलं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली आहेत. त्यातील काही चांगल्या जागेवर कार्यरत आहेत तर गौरी वैद्य या विद्यार्थिनीची ‘मॅनेजमेंट ऑफ पेटंटस्’ या प्रोजेक्टसाठी टोकियो व सिंगापूरमध्ये प्रेझेंटेशनसाठी निवड झाली आहे. हर्षला बागराव हिला गांधी फेलोशिप मिळाली आहे. तिची दोन वर्षांच्या ‘स्कूल लिडरशिप डेव्हलमेंट’ या कोर्ससाठी निवड झाली आहे.
अनेक विद्यार्थी तंत्रज्ञ, डॉक्टर, मर्चंट नेव्ही, संगणकतज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट असा अभ्यास पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत आणि ते करणारच. कारण त्यांना योग्य मार्गावर नेणारे कार्यकर्ते आणि हे सारे विद्यार्थी ही सारी झपाटलेली आहेत, त्यांना आकांक्षापुढते गगन ठेंगणे वाटते.
(संस्थेशी संपर्क ः www.vsmthane.org / [email protected])




























































