
शिवसेना-भाजप, रिपाइं (अ), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, लहुजी शक्ती सेना तथा मित्रपक्ष महायुतीचे परभणी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांनी 80 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत विक्रमी विजय मिळविला. गंगाखेडमधून रासपाचे रत्नाकर गुट्टे यांनी महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांचा 18 हजार मतांनी पराभव केला. जिंतूर मधून महायुतीच्या मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी विद्यमान आमदार विजय भांबळे यांचा परभव केला. तर पाथरी विधानसभा मतदार संघामधून काँग्रेसचे सुरेशराव वरपुडकर यांनी महायुतीचे आमदार मोहन फड यांचा परभव केला. विजयानंतर शिवसेना -भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा करत जल्लोष साजरा केला.
#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर
30 वर्षांपासून परभणी विधानसभा मतदारसंघावर वर एक हाती सत्ता असणाऱ्या शिवसेनेने यंदा देखील भगवा फडकवला आहे. या वेळचा विक्रम म्हणजे शिवसेनेने तब्बल 80 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून सर्व विरोधी पक्षांना धोबीपछाड दिला. त्याहून विशेष बाब म्हणजे आमदार डॉ. पाटील यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले आहेत. महायुतीचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांना सुमारे 80 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्यांदा परभणी विधानसभा मतदार संघावर विजय झालेल्या आमदार पाटील यांच्याविरोधात अपक्ष तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे, एमआयएमचे उमेदवार आली खान तसेच काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांनी निवडणूक लढवली. मात्र, यापैकी एकाही उमेदवाराला आमदार पाटील यांच्या एकचतुर्थांश देखील मते मिळाली नाहीत.



























































