आधी फॉर्म्युला मग सरकार! उद्धव ठाकरे यांचा ‘आवाज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेत समान वाटा देण्याचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरला होता त्याची आधी अंमलबजावणी करा, नंतरच सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल असा आवाज उद्धव ठाकरे यांनी आज भाजपाला दिला. जागावाटपात समजून घेतले पण सत्तावाटपात समजून घेणार नाही. कारण मलाही शिवसेना वाढवायची आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निकालाविषयी समाधान व्यक्त करताना उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसत होते. त्यामुळे पहिला मुख्यमंत्री कोणाचा? या प्रश्नावर उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले, ‘गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपा युती झाली तेव्हा 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत 144-144 जागा लढवतील, असेही ठरले होते, पण भाजपची अडचण समजून घेऊन आम्ही 124 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला होता. आता भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील. त्यानंतर शिवसेनेचे नेते त्यांच्याशी चर्चा करून सत्ता स्थापनेबद्दल निर्णय घेतील.

पक्ष बदलणाऱ्यांना जनतेने पराभूत केले
सरकार स्थापन करता येईल इतक्या जागा महायुतीला दिल्याबद्दल राज्यातील तमाम जनतेला उद्धव ठाकरे यांनी यावेळी धन्यवाद दिले. कोणत्याही दडपणाला बळी न पडता शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभेल असे मतदान जनतेने केले. पक्ष बदलणाऱ्यांना जनतेने पराभूत केले हे सगळ्यात मोठे काम केले असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जनतेला गृहीत धरून चालणाऱ्यांचे पाय जमिनीवर ठेवणारा हा निर्णय आहे. हा जनादेश डोळे उघडणारा असून या वेळेला ईव्हीएमबद्दल संशय असेल असे वाटत नाही. याप्रसंगी शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे आदी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांत झोपलात तसे झोपू नका-विरोधकांना सल्ला
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा यावेळी वाढल्याबद्दलही उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले त्यावर आनंद व्यक्त करतानाच दुसऱ्याचे चांगले झाले म्हणून माझ्या पोटात दुखणार नाही असे सांगत गेली पाच वर्षे झोपला होतात तसे आता झोपू नका असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधी पक्षांना दिला.

शिवसेना-भाजपचं जे ठरलंय तसेच होणार-मुख्यमंत्री
शिवसेना आणि भाजपचे जे ठरलेय त्यानुसारच पुढे जाणार आणि काय ठरले आहे हे तुम्हाला योग्य वेळी कळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना सांगितले.

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असे ठामपणे सांगतानाच महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. मात्र निवडून आलेले 15 बंडखोर आपल्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी फॉर्म्युला, मग सरकार असे पत्रकार परिषदेत ठामपणे बजावले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले असून आमचे ठरलेय, त्यानुसारच आम्ही पुढे जाणार आहोत. शिवसेना आणि भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आहे. बार्गेनिंग पॉवरवरून ही युती झालेली नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या निवडणुकीत 260 जागा लढवल्या आणि 122 जिंकल्या. तेव्हा भाजपचा स्ट्राइक रेट 47 टक्के होता. यंदा आम्ही 164 जागा लढवल्या आणि 103 जागा जिंकल्या आहेत. म्हणजेच भाजपचा स्ट्राइक रेट 70 टक्के झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शरद पवारांनी आनंदी होऊ नये
विरोधकांना खूप मोठा विजय मिळाला अशी काही परिस्थिती नाही. काही जागा कमीअधिक झाल्या असतील, पण तरीही आमची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आनंदी होण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.