आपला माणूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

गणेश आचार्य. नृत्य दिग्दर्शन ते चित्रपट दिग्दर्शन. एक लयबद्ध प्रवास.

अंधेरीच्या एका नामांकित ध्वनिमुद्रण स्टुडिओत आमची पहिली भेट झाली. आता त्यांना आठवत असेल की नाही माहीत नाही. कारण रोज शेकडो लोकांना भेटणारे आणि तेवढेच त्यांना भेटायला येणारे, यात प्रत्येकाला लक्षात ठेवणं किंवा प्रत्येक भेट लक्षात ठेवणं केवळ अवघडच असावं त्यांच्यासाठी. त्यांचा पीए आला. मला म्हणाला तुम्हाला त्यांनी बोलावलंय. त्यांना तुमच्याशी बोलायचंय. मी वळून पाहिलं ती व्यक्ती हिंदुस्थानातील एक नामांकित नृत्यदिग्दर्शक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गणेश आचार्य होते. मी त्यांच्याकडे गेलो.

‘आपण एक सिनेमा करतोय.’ त्यांचा आपण हा शब्द खूप आपुलकी वाढवून गेला त्या संभाषणातली…
‘मी नटरंग पाहिलाय तुमचा. आपण लवकरच एकत्र काम करू’ त्यांनी माझा  संपर्क क्रमांक घेतला आणि म्हणाले, ‘लवकरच तुम्हाला फोन करतो’ आणि ती भेट संपली.
मुंबईमध्ये बऱयाच वेळा ‘लवकरच एकत्र काम करू’ असं खूप लोक म्हणतात, पण तिथं पुढे काही घडत नाही. तो संवाद तिथंच संपतो, पण गणेश आचार्य यांच्याशी झालेल्या भेटीनं उत्पादक स्वरूप घेतलं.
गणेश आचार्य…
आपण गुगलवर सर्च केलं तर त्यांच्याबद्दल अनेकविध स्वरूपात माहिती मिळेल. रकानेच्या रकाने भरून त्यांच्या कार्याबद्दल, त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आपण काय नवीन लिहिणार? पण गणेश आचार्य यांच्याबद्दल मला त्यांनी सुरुवात केल्यापासून त्यांची जी यशाची कमान आहे त्याचा खूप आदर आणि कुतूहल वाटत आलेलं आहे. एक नवा नृत्य दिग्दर्शक येतो काय आणि आधी स्थिरावलेल्या नृत्य दिग्दर्शकांमध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतो. आपलं नाव ठाशीव करतो आणि उभा राहतो अनेक वर्षे. नव्या पिढीसाठी एक दीपस्तंभ म्हणून ते गणेश आचार्य एक ब्रॅण्ड असले तरीही मला भेटलेले, भावलेले गणेशजी वेगळेच. कदाचित प्रत्येकालाही ते वेगळे वाटत असावेत, हा माझा टेक. गणेशजी अतिशय अस्खलीत मराठी बोलतात. तिथंच नातं जुळून येतं आणि त्यांचा स्वभाव तुम्हाला आपलंसं करतोच करतो.

‘उद्या भेटूया.’ गणेशजींचा फोन.
‘जी…’ मी
भेट ठरली. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी पाठवलेल्या पत्त्यावर वेळेआधीच पोहोचलो. त्यांचं ऑफिस हेरून ठेवलं आणि ठरलेल्या वेळेची वाट पाहत गाडीतच बसून राहिलो. साधारण वेळ साधून मी निघालो. ऑफिसमध्ये गेलो. गणेशजी त्यांच्या केबिनमध्ये होते. त्यांना निरोप जाताच मला आत बोलावलं. ‘exchanging pleasantaries’ म्हणजे काय ते मी त्या दिवशी अनुभवलं.

तुम्हालाही सिनेमा दाखवतो. मला कळेना, मग तेच पुढे म्हणाले, ‘आपला सिनेमा एका दाक्षिणात्य चित्रपटावरून बेतलेला आहे. आम्ही पूर्ण सिनेमा पाहिला. मध्येच ते पॉज करून मी जे त्यातलं पात्र करणार होतो त्याबद्दल सांगत होते. सिनेमा अप्रतिम होता. व्यावसायिक मूल्यांनी ओतप्रोत. मग विषय निघाला सिनेमातील गाण्यांचा आणि मी गणेश आचार्यांचे व्हिजन अनुभवायला लागलो. सिनेमाच्या सिच्युएशनमध्ये त्यांनी गाणी अशी फिट्ट केली होती की लाजवाब. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कोरिओग्राफर-दिग्दर्शकाला काम करताना, त्यांच्या स्टाईलला मी काही फुटांच्या अंतरावरून पाहत होतो… अद्वितीय होता तो क्षण आणि त्या त्यांच्या केबिनमध्ये केवळ त्यांना अनुभवायला, त्यांची सिनेमा, गाणी हाताळण्याची पद्धत मी एक्स्कलुझिव्ह पाहायलाही होतो. त्यांनी गाण्यांसहित दाखवलेला सिनेमा घेऊन मी परतलो तो त्यांची छबी घेऊनच. बरेच दिवस ती भेट मी पुनःपुन्हा अनुभवत होतो. मग आलं रीडिंग सेशन.

आघाडीचा गीतकार गुरू ठाकूर यांनी या सिनेमाचं लेखन केलं होतं. आणि तोच त्या ड्राफ्टचं वाचन करणार होता. गुरूनं केवळ अप्रतिम पटकथा वाचन केलं. पुन्हा एकदा सिनेमा उभा राहिला. मग चर्चा… प्रश्न उत्तर… असं करूया का? तसं करूया का? यावर साधक बाधक चर्चा… मराठी सिनेमात हे फार क्वचितच पाहायला मिळतं. हाही सिनेमा मराठी भाषेतच होणार होता, पण अप्रोच हिंदी सिनेमासारखा होता. प्रोफेशनॅलीजम जाणवत होता… आपण थोडं इथे मिस करतो असं वाटत होतं. तारखा ठरल्या. कपडय़ांची मेजरमेंटस् झाली.

शूटिंगचा दिवस उगवला. गणेशजी सीनविषयी सांगायला व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले. त्यांना पाहून मी थक्कच झालो. त्यांनी इतकं वजन कमी केलं होतं की बस्स. इतक्या लवकर इतकं वजन कमी? पावणेदोनशे-दोनशे किलोवरून एकदम पंच्याऐंशी किलो? कुणीच ओळखू शकणार नाही इतक्या ड्रास्टिक चेंजनंतर. पण यातली एक गोष्ट आहे ती त्यांच्या कमिटमेंटची. हार्डवर्कची. इथे आपण सगळे जाणतो, प्रयत्नही करतो, पण दोन-तीन किलो कमी करायलासुद्धा आपल्याला किती प्रयत्न करावे लागतात. इथं जवळपास शंभर किलो? काय प्रकारची मेहनत त्यांना घ्यावी लागली असेल? किती सातत्य आणि किती गोष्टींपासून दूर, किती गोष्टी वर्ज्य कराव्या लागल्या असतील? बेजोडच…!

लोकेशन पुणे…

कॉल टाइम… सकाळचे साडेपाच. बरहुकूम तयाऱया झाल्या. पाच वाजता गाडय़ा निघाल्या होत्या हॉटेलवरून. पहिला सीन माझाच होतो. गणेशजींनी समजावून सांगितलं आणि महेश लिमये सिनेमाचे छायाचित्रकार आणि आघाडीचे सृजनशील व्यक्तित्व. सीन संपला. सहा वाजता माझं पॅकअप. काम संपलं त्या दिवसाचं. पुढचं शूटिंग होतं त्याच लोकेशनवर, पण त्या लोकेशनवरचं माझं काम संपलं. माझी त्या दिवसासाठी सुट्टी झाली. मी हॉटेलला पोहोचलो.

परफेक्ट प्लॅनिंगचा पुन्हा एकदा अनुभव. 6 वाजता नट रिकामा. यू आर फ्री. नाहीतर आपल्याकडे काही काही दिग्दर्शकांना नटांना विनाकारण बसवून ठेवायची सवय असते. परीक्षेची घडी समोर येऊन ठेपली. एका गाण्यात मला नृत्य करायचं होतं थोडंसं. नृत्य थोडंसंच  का असेना, पण ते गणेश आचार्य यांच्यासमोर? भीतीच… तुम्ही कितीही नृत्य शिकलेले असा तुम्ही फिके आहात त्यांच्यासमोर. त्यांनी मला नाचून दाखवलं आणि करायला सांगितलं. मला दहा टक्के पण नाही जमलं. पुन्हा शिकवलं. पुनःपुन्हा… शॉट ओके झाला. पण मला अजूनही वाटतं की मला त्यांच्यासारखं नाही जमलं. कसं जमेल? त्यांची प्रतिमा त्यांची त्या क्षेत्रातली मेहनत किती खडतर? तुम्हाला लगेच कसं जमेल? ‘आभाळातून पडली काकडी, काशाची शेंडी वाकडी’ हे गाणं एकदा यू टय़ूबला जाऊन बघा. गणेशजींची कमाल आणि मला कसं जमलं नाही हेही पहा.

टप्प्याटप्प्यानं सहा ते सात महिने चित्रीकरण चालू होतं. एक दिवस जोरजोरात वारं वाहू लागलं. माझ्या बॉयकडे असलेली छत्री प्रचंड वाऱयाच्या झोतामुळे एकदम उलटी झाली. अचानक गणेशजी माझ्याजवळ आले. ती विस्कळीत झालेली छत्री घेतली आणि एक नवीन छत्री मला दिली. ही कितीही वारा आला तरी उलटी होणार नाही. किती आत्मीयता आपल्या नटांबद्दल. आजही ती छत्री, तिची सावली अंगावर पडली की मला गणेश आचार्य यांची आठवण येतेच.

गणेशजी थँक्स…

[email protected]