
>> शशिकांत सावंत
यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार हिंदुस्थानी वंशाचे अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी, ईस्टर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांना जाहीर झाला आहे. पूर्कमितीच्या साऱ्या संशोधन पद्धतींना छेद देत या तीनही संशोधकांनी हिंदुस्थान आणि आफ्रिकेमध्ये जाऊन, तेथील गरीब लोकांसोबत राहून गरिबीची निरीक्षणे नोंदवून संशोधन केले. त्यामुळे त्यांचे संशोधन केवळ प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न राहता त्याचा आधार घेत त्या त्या देशाने दारिद्य्र निर्मूलनासाठी योजना तयार केल्या. इस्टर डफ्लो या अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधनपर शिक्षणाबरोबरच त्यांनी कोलकाता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे.
अभिजित बॅनर्जी, एस्थर डफ्लो आणि क्रेमार यांना नुकताच नोबेल जाहीर झाला. पण डफ्लो यांचा करिश्मा, मेहनत आणि लगन या नोबेलमागे नक्कीच आहे. फेब्रुवारी 2010 मध्ये लाँग बीच कॅलिफोर्निया इथे तिने ‘टेड टॉक’ मध्ये भाषण केले. यात तिने म्हटले की, जगात दर आठ दिवसाआड 25000 लोक दगावतात. जे टाळता येणे शक्य आहे. त्यावर उपाय काय तर तिने एक ग्राफ दाखवला आणि म्हणाली, विकसित जगाने यावर कसे काम करायला हवे तर ग्राफमध्ये आफ्रिकेला 2001 ते 2010 च्या दशकात देण्यात आलेली मदत दाखविण्यात आली होती आणि दरडोई एकूण उत्पन्न त्या दशकात कसे बदलत गेले तेही दाखवले. मदत जरी वाढत गेली तरी जीडीपी त्या प्रमाणात वाढला नव्हता. हे सांगून डफ्लो म्हणाली, या मदतीशिवाय काय झाले असते हे सांगणे कठीण आहे. त्यानंतरच्या आठच दिवसांत तिने बिल गेटस्बरोबर दोनदा जेवण घेतले. त्या भेटीत बिल गेटस् प्रभावित झाले होते. आम्ही तुमच्या कामाला पैसे द्यायलाच हवे असे गेटस् म्हणाले.
कॅलिफोर्निया येथील एमआयटी ही केंब्रिज भागातील सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे. नाओम चोम्स्किसारखा संशोधक तिथे काम करत असल्यामुळे ते अनेकांना माहीत आहे. याच विद्यापीठात ती आपले गुरू आणि पती अभिजित बॅनर्जी यांच्याबरोबर काम करते. मुळात ती फ्रेंच नागरिक आहे. तिची आई डॉक्टर होती आणि दरवर्षी ती काही दिवस आफ्रिकेत जाऊन मदतीचे काम करत असे. तिचे वडील प्राध्यापक होते. सुशिक्षित आणि सुखवस्तू घरात तिचा जन्म झाला. रशियन भाषेच्या ओढीमुळे तिने रशियन शिकायला घेतले आणि फ्रान्समधील शिक्षण चालू असतानाच ती रशियात काम करायला गेली.
फ्रान्समध्ये इतिहासाची पदवी घेतल्यानांतर 1993 मध्ये 10 महिने तिने मॉस्कोमध्ये घालवले. तिला इतिहासकार व्हायचे होते. मॉस्कोमध्ये तिने एका फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाबरोबर संशोधक सहाय्यक म्हणून काम केले. जो बँक ऑफ रशियाबरोबर काम करत होता. त्या काळात तिच्या लक्षात आले की, अर्थशास्त्रामध्ये जगाला आवश्यक अशी कृती करण्याची क्षमता आहे. पॅरिसला 1994 साली तिने आपली डिग्री पूर्ण केली. ती आणि तिच्या तेव्हाच्या मित्रांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला आणि ज्याला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणतात त्याचा अभ्यास अभिजित बॅनर्जींच्या वर्गात सुरू केला. एका महिन्यात तिच्या लक्षात आले की, आपल्याला आयुष्यात जर काही करायचे असेल तर ते हेच. या काळातील तिचे एक संशोधन एवढे गाजले की, अनेक विद्यापीठांनी तिला आपल्याकडे बोलावले, पण आपल्याकडच्या पदवीधारकांना इथे नोकरी द्यायची नाही हा नियम डावलून एमआयटीने तिला संशोधक म्हणून रुजू करून घेतले. याच काळात डफ्लोचे सहकारी जोशोआ यांनी तिला प्रयोगासाठी अभिनव पद्धत वापरण्याचा सल्ला दिला. ती पद्धत होती ‘randomist’.
अभिजित बॅनर्जी तिचे प्राध्यापक होते. 2003 मध्ये (J-pal) या नावाने ओळखल्या जाणाऱया ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब’ची अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो या दोघांनी मिळून स्थापना केली. या लॅबचे उद्दिष्ट असे होते की, दारिद्रय़ाचे निर्मूलन आर्थिक आणि वैचारिक प्रयोगांद्वारे शक्य आहे असे मानून त्याचा अभ्यास करून या प्रयोगाकडे जगभरच्या अर्थशास्त्र्ाज्ञांचे लक्ष गेले. बिल गेटस्सारख्या व्यक्तांनी त्यात रस घेतला. वैद्यकशास्त्रातून त्यांनी औषधांचा प्रभावीपणा शोधणारी एक पद्धत आयात केली. 1940 च्या दशकात वैद्यकशास्त्रात ही पद्धत अमलात आणली गेली. जिचं वर्णन डफ्लो एक ‘टूल’ असं करतात. यात काही आजारी माणसांना निवडून त्यांच्यावर चाचणी घेतली जाते आणि काहींना औषध दिले जात नाही. या दोन्ही गटांचा अभ्यास केला जातो.
औषधाच्या चाचणीप्रमाणेच डफ्लो आणि त्यांच्या सहकाऱयांनी ती चाचणी काही जणांवर केली आणि काही गट तसेच ठेवले. या दोन्ही गटांचा अभ्यास केल्यावर एखाद्या आर्थिक धोरणाने लोकांच्या जीवनात खरंच फरक पडतो का हे समजून घेता येते असा या मंडळींचा दावा होता. अनेक प्रकारची धोरणं त्यांनी या पद्धतीतून तपासली. मायक्रोफायनान्सने लोकांना फायदा होतो का? शिक्षकांना वर्गात येण्यासाठी अमूक पद्धतीने उद्युक्त करता येते का? किंवा गरीबांना मलेरिया होऊ नये म्हणून अमुक पद्धत वापरता येईल का? त्यांना मछरदाण्या मोफत देणे अधिक उपयुक्त ठरेल की विकत घेतलेली गोष्टच लोक नीट वापरतात? (केनियामध्ये मछरदाण्यांच्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी) या प्रकारच्या अनेक धोरणांचा अभ्यास J-pal लॅबने केला. डफ्लो हिला 2010 साली जॉन बेटस् क्लार्क मेडल मिळाले. जे चाळिशीच्या आतील अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाला दिले जाते. तिला मॅकार्थकची जिनियस फेलोशिपही 2009 साली मिळाली आहे आणि तिने युनोच्या जनरल असेम्ब्लीत आपल्या कामाबद्दल भाष्य केले.
हिंदुस्थानातच राजस्थान, बिहारपासून ते हैदराबादपर्यंत अनेक ठिकाणी बॅनर्जी, डफ्लो यांनी प्रयोग केले. राजस्थानात शिक्षकांनी कामावर यावे म्हणून त्यांना कॅमेरा देऊन फोटो काढण्याचे काम देण्यात आले. याचा उपयोग शिक्षकांची आणि परिणामी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यात झाला. निवडणुकांच्या काळात स्थानिक कलाकारांना घेऊन भ्रष्ट राजकरण्यांना निवडून देऊ नका, असा प्रचार करणारी नाटुकली बसवण्यात आली. त्यासाठी क्रिप्ट लिहिण्यापासून कलाकार निवडण्यापर्यंत अनेक कामे डफ्लो आणि तिच्या सहकाऱयांनी केली. 2003 पासूनच्या सात-आठ वर्षांतच त्यांनी 200 हून अधिक ठिकाणी हे प्रयोग केले.
सार्वजनिक स्वरूपाच्या निर्णयांचा समाजावर किती परिणाम होतो हे तपासणे हा तिच्या कामाचा एक गाभा राहिलेला आहे. यासाठी थोडा वेगळेपणा तिने अवलंबला. उदाहरणार्थ महिला सरपंच असलेल्या ठिकाणी बदल होतात का हे तपासण्यासाठी माणसं जातात, पण त्यांना गावची सरपंच महिला आहे हे माहीत असतं. उलट बॅनर्जी आणि डफ्लो यांच्या पाहणीत त्यांनी या चाचण्या करताना गावची सरपंच कोण आहे हे पाहणी करताना सांगितलेच नाही आणि मग जेव्हा निष्कर्ष तपासले तेव्हा असे लक्षात आले की, ज्या गावात पाणी आणि इतर विकास प्रक्रियांना महत्त्व दिले जात होते त्या गावाच्या महिला सरपंच या प्रमुख होत्या.
डफ्लो सांगतात, ‘माझे निष्कर्ष आधी ठरलेले नसतात. अनेकदा प्रतिकूल ठरले तरी त्याचा मला त्रास होत नाही.’ अनेकदा वैचारिक क्षेत्रात काम करणाऱयांमध्ये अभिनिवेश आणि हट्टीपणा दिसतो, पण डफ्लोंमध्ये तो अजिबात नाही आणि नोबेलइतकीच ही सुखावणारी गोष्ट आहे. हा साधेपणाच आज त्यांना नोबेल पारितोषिकापर्यंत घेऊन गेलेला आहे.
























































