राममंदिरासाठी संयम बाळगा! मोदींची ‘मन की बात!’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mann-ki-baat-modi-pm

अयोध्या रामजन्मभूमीप्रकरणी 2010मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा संपूर्ण देशाने अत्यंत संयम आणि सामंजस्याने स्वीकारला. यातून देशाची एकताच दिसून आली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की, बात’मध्ये म्हटले. मोदी यांनी न्यायालयाच्या 2010सालच्या निर्णयाचा उल्लेख करून सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीप्रकरणी नोव्हेंबरमध्ये येणारा निकालही देशाने याच संयम, सामंजस्याने स्वीकारावा, असे सूचक विधान केले.

हिंदुस्थानचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबरला जयंती आहे. ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगितले. ते म्हणाले, ‘पटेल यांनी देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेतले. त्या निर्णयांची कठोरपणे अंमलबजावणी केली. आजचा हिंदुस्थानी समाजही आता एकता आणि अखंडतेबाबत जागरूक झाला आहे. ही एकता आणि अखंडता 2010च्या अलाहाबाद खटल्यावेळी दिसली.’

देशाने न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला!

‘रामजन्मभूमीप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी दोन आठवडे देशभरात उलटसुलट चर्चांनी वातावरण तापले होते. निकालानंतर काय घडेल, लोक कशी प्रतिक्रिया देतील याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका होती. मात्र, प्रत्यक्ष निकाल दिल्यानंतर सरकार, साधुसंत आणि लोकांनीही अत्यंत संतुलीत आणि संयमी भूमिका घेतली. संयमी विधाने केली. देशाने न्यायालयाचा निर्णय स्वीकारून त्याचा योग्य तो सन्मान केला. तो दिवस माझ्या आजही चांगलाच लक्षात आहे,’ असे मोदी यांनी म्हटले.