
मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकालात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आपल्या नशिबातील चढउतार अनुभवायला मिळाले आहेत. एकीकडे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळालाय तर दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची परवानगी घ्यावी लागत आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात राजनाथ सिंह हे गृहमंत्री होते. त्यावेळी डोवाल हे नॉर्थ ब्लॉकच्या बैठकांना हजर राहू शकत होते. अमित शहा हे गृहमंत्री बनल्यापासून त्यांना अशा बैठकांकडे पाठ फिरवावी लागली आहे. एवढेच नव्हे तर गुप्तचर संस्थेचे प्रमुख तसेच इतर सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना कोणताही आदेश देण्यापूर्वी शहा यांची परवानगी घ्यावी लागत आहे. एकीकडे अधिकारांना कात्री लागली असताना डोवाल यांच्या पदरात काही चांगल्या गोष्टी पडल्या आहेत. यापूर्वी त्यांचे कार्यालय सरदार पटेल भवनाच्या एका माळ्यावर होते. परंतु आता त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असून नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालयाची पूर्ण इमारत त्यांच्या ताब्यात आहे.
कलम 370 निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी काही अधिकाऱयांवर जबाबदारी सोपवली होती. त्यात डोवाल यांचेही नाव होते. डोवाल यांनी कश्मीर खोऱयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते
























































