उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? दिवसभर एकच चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तास्थापनेसाठी राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या पारडय़ात मतदान केले असले आणि महायुतीचेच सरकार येणार हे राजकीय विश्लेषक ठामपणे सांगत असले तरी मुंबईत राजकीय हालचालींनी कमालीचा जोर धरला आहे. मुख्यमंत्र्यांची पलटी आणि शिवसेनेचा आक्रमकपणा या राजकीय घडामोडींमुळे राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली अधांतरीच राहिल्या आहेत आणि पेच निर्माण झाला आहे. आमच्या मागण्या सत्य आणि न्याय्य असल्याचे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला ठणकावले असून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती.

विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या जागावाटपावेळी तुमची अडचण समजून घेतली. आता मात्र अधिक अडचणी समजून घेता येणार नाहीत. जे मागे ठरले आहे त्याप्रमाणेच सत्तावाटप व्हायला हवे असे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला ठरला होता अशी आठवणही भाजपला करून दिली होती. आज मात्र मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली आणि शिवसेना संतापली. आता बैठक तर रद्द झाली आहे, पण पुढे काय असा पेच निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी स्पष्ट बहुमत असतानाही महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणुकीआधी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सत्तेतील पदांचे वाटप झाले पाहिजे अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. त्यापूर्वी म्हणजे 8 नोव्हेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन नवी विधानसभा गठीत करावी लागणार आहे. हे लक्षात घेता शिवसेना-भाजपला सत्तास्थापनेबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करावा लागणार आहे.