एका प्राध्यापकाला दोन संस्थांमध्ये शिकवणीस बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉक्टर जसे एकापेक्षा अनेक रुग्णालयांमध्ये कार करतात तसेच प्राध्यापकही एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये शिकवणी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची गंभीर दखल अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतली आहे. असे आढळून आल्यास संबंधित प्राध्यापक आणि संस्थेवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा एआयसीटीईने दिला आहे.

देशातील दहा हजारांहून अधिक इंजिनीयरिंग महाविद्यालये आणि इतर तंत्रशिक्षण संस्था या एआयसीटीईच्या अखत्यारीत येतात. प्राध्यापकांना एकाच वेळी दोन ठिकाणी शिकवण्यास परवानगी नाही. तरीसुद्धा काही संस्थांमधील प्राध्यापक हे त्याच संस्थेचे दुसरे महाविद्यालय किंवा अन्य ठिकाणी शिकवणी घेतात. काही संस्थाच त्यांना संलग्नता वाढवून मिळावी यासाठी अशा पद्धतींचा अवलंब करत असतात. परंतु यापुढे अशा तक्रारी आल्यास किंवा माहिती मिळाल्यास त्याची शहानिशा करून संबधित संस्थेची संलग्नताच रद्द केली जाईल असे एआयसीटीईने संलग्न संस्थांना कळवले आहे.

प्राध्यापकांनी एकाच वेळी दोन संस्थांमध्ये शिकवणी घेतली तर त्याचा परिणाम तंत्रशिक्षणाच्या दर्जावर होतो. त्याचप्रमाणे असे करणे म्हणजे संलग्नतेसाठी संस्थेकडून दिल्या जाणाऱया प्रतिज्ञापत्रातील नियमांचे उल्लंघन आहे असे एआयसीटीईचे म्हणणे आहे.