टिकटॉकसाठी जीवघेणा स्टंट करणे पडले महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिकटॉकवर फेमस होण्यासाठी हार्बरवर जीवघेणे स्टंट करणाऱयाच्या वडाळा रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फैजान शेख असे त्याचे नाव आहे. स्टंट बाजी प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांची यंदाच्या वर्षातील ही तिसरी कारवाई आहे.

दोन दिवसांपूर्वी टिक टॉकवर एक तरुण लोकलच्या दरवाजावर उभे राहून जीवघेणे स्टंट करत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्याची दखल वडाळा रेल्वे पोलिसांनी घेतली. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांच्या पथकाने तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांना फैजानची माहिती मिळाली. त्याच्या विरोधात अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्या अटकेकरता पोलिसांनी सापळा रचला. मंगळवारी फैजान आणि एक अल्पवयीन मुलगा हे दोघे टिळक नगर रेल्वे स्थानकात आले होते. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. स्टंट प्रकरणी फैजानवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर व्हिडीओ काढल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले.

हिट मिळवण्यासाठी जीव घालतात धोक्यात
टिक टॉकवर हिट मिळ्वण्यासाठी अनेक जण स्टंट असलेले व्हिडीओ पोस्ट करतात. व्हिडीओमध्ये जितके स्टंट असतील तितके त्याला जास्त हिटस मिळतात. हिट्स मिळवण्याच्या नादात तरुण हे धावत्या लोकलमध्ये जीव घेणे स्टंट करतात.