आभाळमाया – अंतराळ फराळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध देशांचे महत्त्वाकांक्षी अवकाश प्रकल्प अंतराळ व्यापायला सिद्ध झालेत. जोपर्यंत केवळ निर्जीव यानं अंतराळात उडत होती किंवा चंद्र-मंगळावर जात होती तोपर्यंत सौर ऊर्जा किंवा कृत्रिम ऊर्जेचं खाद्य त्यांना चालत होतं, परंतु माणूस तिथे जाऊ लागल्यावर मात्र त्याला रुचेल आणि अंतराळातही पचेल असे खाद्य पदार्थ त्याच्यासोबत पाठवणं अनिवार्य ठरलं. त्यातून स्पेस स्टेशनसारख्या ठिकाणी अनेक दिवसांचा मुक्काम ठोकून राहायचं तर भोजनाची सोयही तेवढी हवीच. ट्रिपसारखा दोन दिवसांचा ‘डबा’ नेऊन थोडीच भूक भागणार?

मग त्यावर उपाय म्हणून पृथ्वीवरून अधूनमधून अन्न ‘पॅक्ड फूड’च्या पद्धतीने पाठविण्यात येऊ लागलं. मात्र त्यासाठी पुन्हा एखादं यान सोडून, ते अंतराळ स्टेशनाला जोडून त्यातले पदार्थ देण्याचा खर्चही वाढला. आता मंगळासारख्या वर्ष-दोन वर्षांच्या प्रवासाला निघायचं तर इथून जेवणाचा डबा पाठवणं अशक्यच. त्यावर उपाय म्हणून विविध कल्पना समोर आल्या. त्यापैकी काही विस्मयजनक असून त्या यशस्वीही झाल्या आहेत.

अंतराळ स्थानकावरच सलाडसाठीच्या लॅटय़ूससारख्या वनस्पतींची यशस्वी लागवड करण्यात आली. आता तर ‘नासा’ अंतराळबाग तयार करण्याचा विचार करत आहे. अवकाशात जायचं तर तिथल्या भाज्या, फळं तिथल्याच ‘शेतात’ तयार झालेली हवीत. त्यासाठी आवश्यक ते वातावरण तयार करून ‘मायक्रोगॅव्हिटी’मध्येही उगवू शकतील अशाच भाजीपाण्याची निवड करण्यात आली. त्याचबरोबर स्ट्रॉबेरीसारखी आवडीची फळं तिथेही कशी चाखता येतील यावर विचार होऊन स्ट्रॉबेरीसह गाजर वगैरे ‘पिकवण्यासाठी’ चंद्राभोवती फिरणारं एखादं स्पेस स्टेशन असावं असं ठरतंय.

सध्याचं स्पेस स्टेशन रशिया-अमेरिकेच्या संयुक्त उपक्रमातून साकारलं असून पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावरून ते पृथ्वीभोवती फिरत असतं. हे अंतर इथून तिकडे काही पाठवायला फार आहे असं नव्हे, परंतु ते अंतराळात वेगाने पृथ्वीभोवती फिरतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा पृथ्वीवरच्या एवढ्या अंतरावर कोल्ड स्टोअरेज व्हॅनमधून अन्न पाठवणं सोपं आहे, परंतु अंतराळ स्थानकावर ते पाठवताना मर्यादित वजनाचं आणि रॉकेटद्वारेच पाठवावं लागतं हा महत्त्वाचा फरक.

गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीने ‘थ्रीडी प्रिंटिंग’च्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. एखादी वस्तू बनवून दूर पाठविण्यापेक्षा त्याचा सूक्ष्म आराखडा बनवून, तशाच द्रव्याचा वावर करून तो अन्यत्र ‘प्रिंट’ केला तर ती वस्तू जिथे गरज आहे तिथेच तयार होईल. अमेरिकेतल्या मैनी विद्यापीठात अशाच पद्धतीने अडीच हजार किलो वजनाची (अडीच टनांची) एक फायबरची 25 फूट लांबीची सुबक बोट थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनवली गेली. या यशानंतर आता तेथील तंत्रज्ञ यापेक्षाही मोठय़ा बोटी अशाच प्रकारे तयार करण्याचा विचार करत आहेत.

हेच थ्रीडी तंत्रज्ञान अंतराळातील ‘खाद्या’साठी वापरता आलं तर… असा विचार येताच शास्त्रज्ञ काम करू लागले. खाद्यान्न असलेले पदार्थ किंवा प्राणी यांचा व्हेज-नॉनव्हेज आहार पृथ्वीप्रमाणेच अंतराळवासी माणसालाही मिळावा हा यामागचा हेतू साध्य होताना दिसतोय.

अंतराळात शेती करून वनस्पती वाढवता येतील, पण मटण, मासे यांचं काय? त्यासाठी अशा खाद्यजिवांच्या पेशी आणि स्नायूंचे सूक्ष्म भाग बायोप्सी करताना घेतात तसे घेऊन त्याची स्वयंवृद्धी करण्याचं तंत्रज्ञान या जैविक थ्रीडी प्रिंटिंगमागे आहे. आता ते नेमकं कसं घडतं यावर त्यातील तज्ञच अधिक प्रकाश टाकू शकतील. मात्र अशा प्रकारे काही प्राणी आणि माशांच्या पेशी आणि स्नायूंमधून घेतलेल्या पेशींच्या ‘टय़ूब’ सोयूझ या रशियन यानातून गेल्या सप्टेंबरमध्ये अंतराळ स्थानकाकडे रवाना झाल्या. मग मॅग्नॅटिक थ्रीडी प्रिंटरमध्ये घालून त्यांची पुनर्निर्मिती (रिप्लिका) तयार करण्यात आली. अशा प्रकारे थोड्या जैविक पेशी-स्नायूंपासून हवं तेवढं नॉनव्हेज अन्न तयार करणं शक्य होईल असं या संशोधकांचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर, अशाच तंत्रज्ञानाने पृथ्वीवर जिथे पाण्याची कमतरता असते तिथे अन्नपदार्थ (व्हेज-नॉनव्हेज) तयार करण्याचे प्रयोग यशस्वी झाले तर पृथ्वीवरच्या जैविक वैविध्याचं जतन करूनही माणसाला चविष्ट अन्न मिळत राहील असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो. सध्या तरी हे थ्रीडी प्रिंटेड खाद्य प्रायोगिक स्वरूपात आहे. पुढे पाहूया, काय होतं ते!