बदलत्या वातावरणाने पकडला मुंबईकरांचा घसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्येच ढगाळ वातावरण, मध्येच कडक ऊन तर अधूनमधून पावसाच्या सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव गेले काही दिवस मुंबईकर आणि ठाणेकर घेत आहेत. या बदलत्या वातावरणाने मुंबईकरांचा अक्षरशः घसा पकडला असून सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. आज बुधवारी मुंबईत 35 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाणही 80 टक्क्यांहून अधिक असल्यामुळे मुंबईत प्रचंड उकाडा आहे.

यंदा पावसाळा अधिक लांबल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लहान मुलांना बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक त्रास जाणवत असल्याचेही डॉक्टर म्हणाले. लहान मुलांचा आजार लवकर बरा होत नसून कफ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

थंडा थंडा कूल कूल

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवू लागला आहे. कडक उन्हाने हैराण झालेल्या या मुलीने बर्फाच्या गोळ्याचा असा आनंद घेतला. प्रचंड उकाडय़ापासून सुटका झाल्याचेच भाव जणू काही या मुलीच्या चेहऱयावर थोडय़ा काळासाठी उमटले होते.

फटाक्यांचाही परिणाम

यंदा मुंबईकर शहाणे झाले. त्यांनी कमी प्रमाणात फटाके वाजवल्याचे समोर आले असले तरीही काही प्रमाणात फटाक्यांमुळे प्रदूषण झाले. त्याचा परिणामही आरोग्यावर झाल्याचे डॉक्टरांनी सागितले. दरवर्षी दिवाळीच्या काळात दम्याचा आजार असणाऱयांना प्रचंड त्रास जाणवतो. श्वास घेणे कठीण होऊन बसते. यंदाही हीच परिस्थिती होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.

यंदा पावसाळा अधिक लांबला. त्यामुळे नाक, घसा पकडण्याचा प्रकार दिवाळीच्याही आधीपासून दिसत आहे. सर्दी, खोकल्याने हैराण असलेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. सरकारी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा रुग्णांची गर्दी दिसत आहे. आर्द्रतेचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे रुग्ण सांगतात. – डॉ. सचिन आल्मेल, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट