
तंत्रज्ञान क्षेत्रात सुपर पॉवर होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱया चीनने आज देशातील 40 शहरांत एकाच वेळी 5जी मोबाईल सेवा सुरू करण्याचा पराक्रम केला. त्यामुळे असे हायटेक मोबाईल तंत्रज्ञान पुरवणारा जगातला चौथा देश म्हणून चीनच्या नावाची नोंद झाली आहे. या आधी इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांनी याच वर्षी या सेवेचे जाळे मोबाईल ग्राहकांना पुरवले होते. नव्या 5जी सेवेचा डाऊनलोडिंगचा वेग या आधीच्या 4 जी नेटवर्कपेक्षा 10 ते 100 टक्के अधिक आहे. त्यामुळे ही सेवा नव्या पिढीची हायटेक सुविधा म्हणून ओळखली जाणार आहे. कम्युनिस्ट चीनच्या चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम या सरकारी कंपन्यांनी गुरुवारी चीनच्या 40 शहरांत 5जी मोबाईल सेवा ग्राहकांसाठी सुरू केली. विशेष म्हणजे चिनी 5जी सेवेचे मासिक भाडे सुमारे 1,289 ते 6,030 असे ग्राहकांना परवडणारे असेल.
























































