जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआरएचएम डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग जिल्ह्यात चार महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआरएचएम डॉक्टर मानधनविना काम करीत आहेत. थकीत मानधन न मिळाल्याने 28 ऑक्टोबर पासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया, भूल तसेच प्रसूती सिझर प्रक्रिया ठप्प झाली आहे. डॉक्टरांच्या संपामुळे सर्व सामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआरएचएम डॉक्टर संपावर आणि रुग्ण वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून थकीत मानधन मिळाल्यास हा संप मागे घेणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात आधीच डॉक्टरांची वाणवा असल्याने एनआरएचएम अंतर्गत डॉक्टरांची भरती करण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रिया, हाड तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ अशा नऊ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सेवा मिळत होती. एनआरएचएम अंतर्गत भरती झालेले डॉक्टर हे मानधनावर काम करीत आहेत.

जून महिन्यापासून नऊ डॉक्टरांचे 1 कोटी 33 लाख 77 हजार 550 रुपये मानधन थकले आहे. याबाबत डॉक्टरांनी वारंवार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानधन न मिळाल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली असल्याने अखेर एनआरएचएम डॉक्टरांनी 28 ऑक्टोबर पासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपासले आहे.

एनआरएचएम अंतर्गत भरती झालेले डॉक्टर हे हाड तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद पडली आहे. रुग्णालयात उपस्थित स्त्रीरोग तज्ज्ञ व भुलतज्ज्ञ डॉक्टर यांच्यावर आरोग्य सेवेच्या कामाचा भार वाढल्याने दोन्ही डॉक्टर आजारी पडले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया करणारे एकही डॉक्टर सध्या सेवेत रुजू नाहीत. स्त्री रोग तज्ज्ञ नसले तरी नैसर्गिक प्रसूती परिचारिका मार्फत होत आहे. मात्र सिजर शस्त्रक्रिया डॉक्टर नसल्याने होत नाही. तर हाडतज्ज्ञ ही नसल्याने अपघाताच्या रुग्णांनाही खाजगी रुग्णालयात पाठवले जात आहे. तसेच भुलतज्ज्ञ डॉक्टरही नसल्याने शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा रामभरोसे झाली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी शासनाकडे डॉक्टरांचे थकीत मानधन लवकरात लवकर देण्यास पत्रव्यवहार केलेला आहे. डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांना आता शस्त्रक्रिया उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. डॉक्टरांचे थकीत मानधन शासनाकडून न मिळाल्याने रुग्णांना मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्यापूर्वीही एनआरएचएम डॉक्टरांनी थकीत पगारासाठी काम बंद अनोदलन पुकारले होते.

‘अनुदानाअभावी डॉक्टरांचे मानधन देणे बाकी आहे. शासनाकडून अद्याप अनुदान उपलब्ध झालेले नाही. त्याची मागणी केली आहे वारंवार पाठपुरावा सुरू आहे.’ – दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद