अहमदाबादमध्ये साकारत आहे जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हिंदुस्थानात साकारले जात आहे. या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार असून ती ऑस्ट्रलियाच्या “बिग बॅश” मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंडपेक्षा 10 हजारांनी अधिक आहे. जानेवारी 2020 मध्ये हे जगातले विराट स्टेडियम क्रिकेट लढतींसाठी सज्ज होणार आहे. त्याचे नूतनीकरण आता पूर्ण झाले असून केवळ सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या संपूर्ण नूतनीकरण प्रकल्पासाठी एकूण 700 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी दिली. हे स्टेडियम क्रिकेटशिवाय टेबल टेनिस ,बॅडमिंटन ,जलतरण आणि स्क्वाश या इनडोअर खेळाचीही सुविधा पुरवणार आहे.

अहमदाबादचे मोटेरा स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये जगातील सर्वात भव्य क्रिकेट स्टेडियम साकारण्याची योजना आखली. त्या योजनेची कार्यवाही आता पूर्ण होत आहे. आणखी 2 महिन्यांनी हे स्टेडियम लढतींसाठी सज्ज होणार आहे. याची प्रेक्षक क्षमता मेलबॉर्न मैदानापेक्षा 10 हजाराने जास्त आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा बहुमान आता हिंदुस्थानला लाभणार आहे. या स्टेडिअमचे नावही आता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.

मोटेरा ,अहमदाबाद येथे एकूण 63 एकर जागेवर साकारण्यात आलेले सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम देशाचे भूषण ठरणार आहे. मेलबोर्न,ऑस्ट्रेलिया येथे उभारण्यात आलेले भव्य एमसीजी स्टेडियम उभारणाऱ्या आर्किटेक्ट्नीच मोटेरातील हे भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम साकारण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

सरदार पटेल क्रिकेट  स्टेडिअमची वैशिष्ट्ये 

  • 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात
  • 63 एकर जागेवर स्टेडुं संकुल वसले आहे
  • 76 कॉर्पोरेट बॉक्स बसवले आहेत.
  • 4 ड्रेससिंग रूम्स,3 इतर मैदाने
  • इनडोअर खेळांचीही सुविधा
  • 55 रूम्सचे क्लब हाऊस,प्रशिक्षण केंद्राची सुविधा
  • ऑलिम्पिक धर्तीचा स्विमिंग पूल ,बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट
  • स्क्वाश कोर्ट आणि थ्री डी प्रोजेक्टर्सची सुविधा
  • पूर्ण परिसर सौर ऊर्जेने उजळवून टाकणार
  • 300 मीटर अंतरावर मेट्रो स्टेशन
  • स्टेडियममधून थेट मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी मोठे रॅम्प,ज्यावरून 60 हजार लोक चालू शकतील