
जगभरात कर्करोग वाऱ्याच्या वेगाने पसरत असून दरवर्षी तब्बल 2 कोटी लोक या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. वर्ष 2017-18 मध्ये हिंदुस्थानात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये तब्बल 324 टक्क्यांची वाढ झाली आहे. यात तोंडाचा कर्करोग, सर्व्हाइकल कर्करोग आणि ब्रेस्ट कर्करोगाचा समावेश आहे.
‘नॅशनल हेल्थ प्रोफाईल 2019’ मधून ही माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये 6.5 कोटी लोकांनी राज्याराज्यांतील विविध तपासणी केंद्रात कर्परोगाची तपासणी केली होती. यात 1.6 लाख लोकांना कर्करोगाची लागण झाल्याचे समोर आले. 2017 मध्ये हा आकडा केवळ 39 हजार 635 इतका होता. 2017 ते 2018 मध्ये तपासणी केंद्रात पोहोचणाऱ्या रुग्णांची संख्याही दुप्पट झाली आहे. 2017 मध्ये 3.5 कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. एका वर्षात ही संख्या 6.6 कोटी इतकी झाली.
कर्करोगवाढीचे कारण बदलती जीवनशैल
कर्करोगवाढीचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली हे आहे. मानसिक ताण, खाण्या–पिण्याच्या सवयी, तंबाखू, दारूचे सेवन यामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. ऍक्शन कर्करोग रुग्णालयाचे डॉ. हरप्रीत सिंह यांनी सांगितले,‘सतत बसून राहणे त्यामुळे लठ्ठपणा येणे म्हणजे कर्करोगासाठी आमंत्रण देण्यासारखे आहे. ब्रेस्ट कर्करोगासाठी आम्ही ब्रेस्ट फीडिंग करण्याचा सल्ला देतो.’
- 2018 मध्ये सर्वाधिक कर्करोग रुग्ण गुजरातमध्ये आढळले. त्याखालोखाल कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.
- गुजरातमध्ये 2017 साली 3939 कर्करोग रुग्ण होते. 2018 मध्ये ही संख्या 72,169 वर पोहोचली.
- आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कर्करोग रुग्णांचे प्रमाण कमी होते, पण 2018 पर्यंत या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे.


























































