
ओडिशातील गांजम जिह्यातील एका पंचायतीने उघडय़ावर शौचविधी करणाऱया 24 कुटुंबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत होणारा रेशन अन्नधान्याचा रेशन पुरवठा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर चोहोकडून टीका झाल्यावर अखेर पंचायतीने आपला वादग्रस्त निर्णय मागे घेतला.
सानाखेमुंडी गटातील गौतमी पंचायतीने रस्त्यावर शैच केल्याच्या कथित आरोपानंतर 24 कुटुंबांचा रेशनधान्य पुरवठा रोखला होता. गौतमीचे सरपंच सुशांक स्वाइन यांनी सार्वजनिक धान्य वितरणाचे धान्य कोणत्याही कुटुंबाला नाकारण्याचा आमचा हेतू नव्हता असे सांगितले.
वारंवार मोहिमा राबवून, खुल्या जागेवर शौच करण्याच्या या कुटुंबांच्या सवयीबद्दल आम्हाला त्यांना इशारा द्यायचा होता असे सरपंच म्हणाले. ज्या कुटुंबांना गेल्या आठवडय़ात रेशनधान्य दिले गेले नाही त्यांना या आठवडय़ात रेशनधान्य दिले जाईल. ऑक्टेबर महिन्यातील रेशन 10 नोव्हेंबरपर्यंत दिले जाणार आहे असे स्वाइन यांनी स्पष्ट केले. गौतमी पंचायतीची 20 ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. त्यात 24 कुटुंबांचा सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील धान्य पुरवठा रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
घटनेत अन्नहक्क समाविष्ट असताना पंचायतीने त्यावर बंदी घातल्यामुळे अनेकांनी याला तीक्र विरोध केला होता. पंचायतीच्या महिला सदस्यांनी या निर्णयाविरोधात गट कार्यालयासमोर निदर्शने केली. गटविकास अधिकाऱयाने आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले होते.
सध्या 180 कुटुंबांकडे शौचालये नाहीत. त्यांना स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शौचालये बांधून दिली जातील असे सामामुखेडीचे गटविकास अधिकारी गायत्रीबुट्टा नायक यांनी सांगितले. पंचायतीने या कुटुंबांना पुढील दोन महिन्यांत शौचालये बांधण्यास सांगितले आहे.
दरम्यान, पंचायत परिसरात उघडय़ावर शौच करण्याचे थांबविण्यासाठी लवकरच उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि महिला बचत गटाची बैठक आयोजित करणार असल्याचे सरपंच स्वाइन यांनी सांगितले. अनेकांच्या घरी शैचालये आहेत तरीही हे लोक उघडय़ावर शौच करण्याची सवय सोडत नाहीत अशी खंत स्वाइन यांनी व्यक्त केली.
























































