
नगर- कोपरगाव महामार्गाच्या दुरूस्तीसाठी संतप्त शिवसैनिकांची शिवसेना खासदार सदाशीव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली टोल नाका बंद पाडला. जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल चालू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नगर- शिर्डी -कोपरगाव या महामार्गाची दैना झाली असून सर्व मार्ग खड्यात हरवला आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडून अनेकांचे बळी जात असताना या मार्गाची दुरूस्ती न करता केवळ टोल वसूली केली जाते. वारंवार मागणी करूनही दुरूस्तीकडे कानाडोळा करणाऱ्या सुप्रिम कंपनी विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. नागरिकांच्या तक्रारीची शिवसैनिकांनी दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम राहाता तहसिल कार्यालयात जाऊन धरणे आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी गोवींद शिंदे, तहसिलदार हिरे, जागतीक बँक प्रकल्प अधिकारी मेहेत्रे यांना निवेदन दिले. जोपर्यंत महामार्ग दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल वसूली बंद करावी तसा आदेश द्यावा अशी मागणी सर्व शिवसैनिकांनी केली. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी शिवसैनिकांसह सुप्रिम टोलनाक्याला ताळे ठोकले व बैठा सत्याग्रह केला.



























































