लोकलप्रमाणे मेट्रो मार्गही एकमेकांना कनेक्ट करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेप्रमाणेच भुयारी, एलिव्हेटेड मेट्रो आणि मोनो रेलही कनेक्ट केली जाणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 ही भुयारी मेट्रो मरोळ नाका येथे घाटकोपर-वर्सोवा मेट्रो-1 मार्गाला तसेच महालक्ष्मी येथे मोनो रेलला कनेक्ट केली जाणार आहे. अशाच प्रकारे मेट्रो-7 आणि 8 चे कनेक्शन एअरपोर्ट टर्मिनल-2 येथे होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सलग प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

मुंबईतील धावपळीत नागरिकांना अनेक गाडय़ा बदलून प्रवास करणे म्हणजे दिव्यच असते. लोकल रेल्वेचे तिन्ही मार्ग एकमेकांना जोडलेले असल्याने लोकल प्रवास हा बहुतांश प्रवाशांना सुकर वाटतो. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी बनू पाहणाऱ्या मेट्रो रेल्वेलाही अशीच सुविधा प्रवाशांना द्यायची आहे. त्यासाठीच मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसीएल) मेट्रो रेल्वेमार्ग ठिकठिकाणी प्रवाशांसाठी जोडण्याचे ठरवले आहे. डी. एन. नगर ते मंडाले हा मेट्रो-2बी मार्ग मेट्रोच्या बीकेसी स्थानकात जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे या मेट्रो मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरही जाता येणार आहे.