
मुंबईत राजकीय खलबते सुरू असतानाच तिकडे जयपूरच्या रिसॉर्टमध्येही बैठक सुरू होती. या रिसॉर्टमध्ये काँग्रेसचे आमदार मुक्कामाला आहेत. दिल्लीहून खास आलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी या आमदारांशी संवाद साधला. तेव्हा बहुतांश आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याबद्दल ठासून सांगितले. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना खरगे म्हणाले, आम्ही वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. सर्व निर्णय आता हायकमांड घेईल.
महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरच्या रिसॉर्टमध्ये नेले आहे. आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह सर्व आमदारांची मल्लिकार्जुन खरगे यांनी भेट घेतली. राज्याच्या राजकारणात काँग्रेसची काय भूमिका असावी याबद्दल खरगे यांनी आमदारांशी चर्चा केली. तेव्हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल आणि सूडाचे राजकारण संपवायचे असेल तर काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे असे आमदारांनी ठामपणे सांगितल्याचे समजते.
दरम्यान, संध्याकाळी भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असे जाहीर केल्यानंतर या आमदारांची पुन्हा बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस आताही वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. दिल्लीहून अहमद पटेल येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा होईल. पटेल नंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आमदारांची भूमिका समजावून सांगतील. त्यानंतर काँग्रेसचा निर्णय जाहीर होईल.



























































