…म्हणून 370 कलम रद्द केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

जम्मू-कश्मीरमध्ये लागू असलेले 370 कलम का रद्द केले याचे नेमके कारण केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हे कलम लागू असल्यामुळे दहशतवादी त्याचा गैरफायदा घेत होते. त्यामुळेच जम्मू-कश्मीरमध्ये लागू असलेला विशेष दर्जा काढून घेतल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायलयात सांगितले. न्यायाधीश एन. व्ही. रमणा, एस. के. कौल, आर. सुभाष रेड्डी, बी. आर. गवई आणि सूर्यकांत या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर कलम 370 आणि 35 एच्या तरतुदी हटवण्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी झाली.

दहशतवाद्यांबरोबरच फुटीरतावादीही या कलमाचा गैरफायदा घेत होते. जम्मू-कश्मीरच्या जनतेला घटनेतील या तरतुदीमुळे कुठल्याही प्रकारचे लाभ मिळत नसल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायलयाला सांगितले. हे कलम सात दशकांहून अधिक काळ या ठिकाणी लागू होते. हे कलम सरकारने रद्द करून टाकले. संसदेत बनवण्यात आलेले अनेक कायदेही या ठिकाणी लागू नव्हते. त्यामुळे येथील लोकांमध्ये सरकारविरोधी भावना होती. तसेच फुटीरतावाद्यांचेही फावत होते. या सर्व बाबींचा विचार करूनच जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

जीवनमान उंचावणार 

जम्मू-कश्मीरमधून हे कलम हटवण्यात आल्यामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल असा विश्वासही केंद्र सरकारने व्यक्त केला. लोकांना विविध प्रकारचे लाभ मिळतील. तसेच अलीकडेच लष्करात भरतीही करण्यात आली. या भरतीलाही येथील तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचेही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.