
लोकलच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाईल पळविणाऱ्या ‘फटका गँग’च्या गुन्ह्यांमध्ये हळूहळू घट होत चालली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना करता यंदाच्या 2019च्या याच महिन्यात जवळपास निम्म्यांहून अधिक संख्येने गुन्हे कमी झाले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2018 मध्ये फटका गँगचे 84 गुन्हे घडले होते. यंदाच्या 2019 मध्ये ऑगस्ट महिन्यात केवळ 14 गुह्यांची नोंद झाली आहे. तर सप्टेंबर 2018 मध्ये 71 गुन्हे नोंद झाले होते. तर यंदाच्या 2019 च्या सप्टेंबरमध्ये ही संख्या 19 इतकी खाली आली आहे. तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातही तब्बल 71 गुह्यांची नोंद झाली होती. यंदाच्या ऑक्टोबरला केवळ 23 गुन्हे पोलीस दफ्तरी नोंदले गेले आहेत. गेल्या वर्षी 2018 मध्ये जानेवारी ते डिसेंबर दरम्यान 12 महिन्यांत एकूण 811 गुन्हे घडले होते. तर यंदा 2019 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंतच्या दहा महिन्यांतील प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 476 गुन्हे नोंदले गेल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर लोकलच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाईल फटका मारून खाली पाडत ते लंपास करण्याच्या घटना वाढल्या होत्या. तब्बल 56 ठिकाणांवर ‘फटका गँग’ने अक्षरशः हैदोस घातला होता. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) लोहमार्ग पोलिसांच्या (जीआरपी) मदतीने येथील धोकादायक ठिकाणांवर 24 तास पाळत ठेवण्यात येत आहे. रेल्वे रुळांच्या शेजारील ओव्हरहेडच्या खांबांमध्ये असे चोरटे लपून बसलेले असतात. त्यांना पकडण्यासाठी तेथे ‘वॉकी टॉकी’ घेतलेले जवान ऊन-पावसाची तमा न बाळगता पेट्रोलिंग करीत आहेत.
फटका गुह्यांची नोंद
साल ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर
2018 84 71 71
2019 14 19 71


























































