राज्यसभा मार्शल्सना आता ‘आर्मी स्टाइल’ गणवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले  मात्र राज्यसभेच्या 250 व्या सत्राच्या सुरुवातीलाच सभागृहाच्या आसनव्यवस्थेत मदत करणाऱया मार्शल्सचा नवीन गणवेश पाहिल्यानंतर सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

‘माननीय सदस्यों…’, ‘माननीय सभापतिजी…’ अशा हाकांनी सर्वसाधारणपणे सभागृहाचे कामकाज नेहमी सुरू होत असे, मात्र  अशा हाका देणारे पगडीधारी मार्शल सोमवारी नव्या पोशाखात दिसले. राज्यसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा या मार्शल्सच्या डोक्यावर पगडीऐवजी निळ्या रंगाची टोपी होती. सोबतच मार्शल्सनी आधुनिक सुरक्षारक्षकांप्रमाणे गणवेशही घातला होता.

राज्यसभा सचिवालयातील सूत्रांच्या मते एका उच्चस्तरीय निर्णयानंतर सभागृहात तैनात मार्शल्सचा गणवेश बदलण्यात आला आहे. मार्शल्सना आता पांढऱया रंगाची पगडी आणि पारंपरिक गणवेशाऐवजी आता निळ्या रंगाचा गणवेश आणि टोपी परिधान करावी लागेल. गेल्या अनेक दशकांपासूनच्या या परंपरागत गणवेशात बदल करण्याची मागणी मार्शल्सकडूनच करण्यात आली होती.

सभागृहात सभापतींसह इतर पीठासीन अधिकाऱयांच्या मदतीसाठी सहा ते सात मार्शल तैनात असतात. आधुनिक आणि चांगला असा गणवेश देण्यात यावा अशी मागणी मार्शल्सकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून राज्य सचिवालय आणि सुरक्षा अधिकाऱयांनी गणवेशाची डिझाईन निश्चित करण्यासाठी विविध बैठका केल्या. मार्शल्सनी या नव्या बदलावर समाधान व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यसभेचे सध्या 250 वे सत्र सुरू आहे. राज्यसभेत 245 सदस्य आहेत. संसदेतील लोकसभा हे कनिष्ठ तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. राज्यसभेची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली होती. 26 नोव्हेंबर रोजी हिंदुस्थानच्या संविधानाला 70 वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने संसदेचे संयुक्त सत्र बोलावण्यात आले आहे.