रक्ततपासू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रजनीश राणे

सध्याच्या जगात श्रीमंत गरीबांचे रक्त शोषतो, मालक कामगारांचे रक्त पितो, सर्वत्र असा रक्तसंघर्ष सुरू आहे. म्हणूनच मग या ‘रक्ता’लाच तपासणारा एक ‘रक्ततपासू’ भेटतो, तेव्हा काचपट्टीवरील लाल ठिपक्यालाही केवढा आनंद होतो. मुंबई-नवी मुंबईतील अशा तब्बल 50 प्रयोगशाळांमध्ये दररोज हजारो काचपट्टय़ा अशा आनंदित होत असतात आणि हा आनंद वाटण्याचे काम करतात डॉ. अविनाश फडके!

मोठा मासा लहान माशाला खातो हे सृष्टीचक्र आहे, मात्र सध्या एकूणच सृष्टीचक्र बिघडले आहे. मोठा मासा त्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्याने बिघडला आहे. आज जेथे पाहावे तेथे ‘रक्तपिपासू’ माणसे पाहायला मिळतात. शब्दार्थाने नव्हे, पण ही माणसे खरेच रक्तपिपासू आहेत. सध्याच्या जगात श्रीमंत गरीबांचे रक्त शोषतो, मालक कामगारांचे रक्त पितो, सर्वत्र असा रक्तसंघर्ष सुरू आहे. म्हणूनच मग या ‘रक्ता’लाच तपासणारा एक ‘रक्ततपासू’ भेटतो, तेव्हा काचपट्टीवरील लाल ठिपक्यालाही केवढा आनंद होतो. मुंबई-नवी मुंबईतील अशा तब्बल 50 प्रयोगशाळांमध्ये दररोज हजारो काचपट्टय़ा अशा आनंदित होत असतात आणि हा आनंद वाटण्याचे काम करतात डॉ. अविनाश फडके!

सर्व जीवनशैलीच बदलली आहे. पायाला चाकं बांधून फिरावे लागते, समोर ताटात पडेल ते पोटात ढकलावे लागते आणि मग त्याचा परिणाम आपसूकच आरोग्य बिघडण्यावर होतो. नंतर फॅमिली डॉक्टर ते मोठ्ठं रुग्णालय असा प्रवास होतो. रोग निदान होते, उपचार होतात. मात्र या प्रवासात सर्वात मोठा टप्पा असतो रक्त तपासणी करणाऱया प्रयोगशाळेचा. माणसाला खूश करण्याचा मार्ग पोटातून जात असला तरी त्या माणसाला ठणठणीत ठेवण्याचा मार्ग एका पॅथॉलॉजी लॅबमधूनच जातो हे आजचे आरोग्य वास्तव आहे. डॉ. अविनाश फडके हे कार्य गेली 50 वर्षे इमाने इतबारे आणि यशस्वीपणे करत आहेत.

खरे तर हा प्रवास सुरू झाला 1963 मध्ये. डॉ. अच्युत फडके यांनी शिवाजी पार्क येथे ऍण्ड्रॉलॉजी सेंटर सुरू केले. ‘मेल फर्टिलिटी’चे महाराष्ट्रातील हे पहिले सेंटर. त्यानंतर या केंद्रामध्ये विविध तपासण्या होऊ लागल्या. 1980 मध्ये डॉ. अविनाश फडके आणि डॉ. वंदना फडके यांनी या केंद्रामध्ये पॅथॉलॉजी सुरू केली आणि मुंबईकरांचे आरोग्य ठणठणीत ठेवण्याचे काम सुरू झाले.

डॉ. अविनाश फडके यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो हे कळत तर नाहीच, पण रक्तातील साखरेचे प्रमाण शोधणारे हे डॉक्टर साखरेसारखेच गोड आहेत हे जाणवते. कुठल्याही आजाराचे निदान रक्त तपासणीनंतरच होते. डॉ. फडके हे निदान करतातच, पण समाजाचे आरोग्य का आणि कसे बिघडले आहे याचेही विवेचन करतात. मुंबईसारख्या अवाढव्य शहरात साथीचे आजार पसरण्याची क्षणोक्षणी भीती असते, मात्र महानगरपालिकेच्या सर्वोत्तम आरोग्यविषयक कामामुळे मुंबईकर निर्धास्त आहेत अशी कौतुकाची पावतीही देतात. देशाचे आरोग्य बजेट वाढवायला हवे ही त्यांची तक्रार आहे तर आजकाल जे पॅथॉलॉजी लॅबचे पेव फुटले आहे याबद्दल चिंताही व्यक्त करतात.

आज डॉ. फडके यांच्या लॅबचा विस्तार प्रचंड वाढला आहे. माहीमला 30 हजार स्क्वेअर फूट जागेत मुख्य लॅब आहे. पन्नास प्रयोगशाळांमध्ये 700 कर्मचारी आणि 30 एमडी पॅथॉलॉजिस्ट काम करत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तब्बल तीन हजार तपासण्या होतात आणि मुख्य म्हणजे दररोज सुमारे 25 हजार टेस्ट केल्या जातात. फडके यांच्या लॅबने सुमारे तीस वर्षांपूर्वी आयएसओ सर्टिफिकेट मिळवले होते हे इथे खास नमूद करावे लागेल.

डॉ. अविनाश फडके यांचे चिरंजीव डॉ. अजय हेसुद्धा आता या लॅबमध्ये वावरू लागले आहेत. फडके घराण्याची ही तिसरी पिढी. पॅथॉलॉजी हा फडके यांचा पिढीजात व्यवसाय असला तरी ‘व्यवसाय’ म्हणून कुणीच त्याकडे पाहिले नाही. एक सेवाधर्म म्हणून हे सारे काही सुरू आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्या आता या व्यवसायात उतरल्या असल्या तरी फडके म्हणजे विश्वास हे समीकरण आता पक्के झाले आहे. हल्ली साधा ताप आला तरी डॉक्टर तपासण्या करायला सांगतात. रोग निदानाचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. केईएम, जेजेसारख्या सरकारी रुग्णालयांभोवती पॅथॉलॉजी प्रयोगशाळांनी जे कोंडाळे केले आहे ते पाहिले तर या व्यवसायातील नफ्याच्या गणिताचे आकलन होईल. डॉ. अविनाश फडके यांना तीच खरी चिंता आहे. अर्धशिक्षित व्यक्तीकडून रक्त तपासणी होणे जिवावर बेतू शकते असा इशारा ते देतात. डॉक्टरांचा सल्ला मानणाऱयांनी हा इशाराही मानायला हरकत नाही!