
उरण तालुक्यातील चिर्ले गावाच्या परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या धास्तीने चिर्ले परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिर्ले गावाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या जंगलामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते.एका व्यक्तीने प्रत्यक्ष समोरून बिबट्याला बघितले होते .मात्र त्याच्या बोलण्यावर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसह,पोलीस यंत्रणेनेही विश्वास ठेवला नव्हता.मात्र दोन दिवसांपूर्वी या बिबट्याने चिर्ले गावातील व्यक्तीला दर्शन दिल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिर्ले गावाच्या उत्तरेला घनदाट जंगल आहे.त्या जंगलात अनेक वन्य पशूंचे वास्तव्य आहे.त्याअनुषंगाने या जंगलात बिबट्याने काही महिन्यांपूर्वी आश्रय घेतला होता. मात्र या जंगलाच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या कंटेनर गोदामांमुळे व तेथे येणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अनेक वन्य श्वापदे जंगलातून दूर निघून गेली आहेत. त्यामुळे या बिबट्याला शिकार मिळणे मुश्किल झाले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास चिर्ले गावातील संजय पाटील यांच्या घरासमोर एक बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. त्याने तिथे बसलेल्या एका कुत्र्याला लक्ष करून त्याच्यावर हल्ला केला तेव्हा संजय पाटील यांना जाग आल्याने त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडीत होता.त्यावेळी घरासमोरील झाडाखाली बांधलेल्या घोड्याने बिबट्याच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला दोरीने बांधले असल्याने तो धडपडून खाली पडल्याने जखमी झाला.तेव्हा नागरीकांनी गोंगाट केल्याने हा बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन जंगलात पळून गेला.
तद्नंतर संजय पाटील यांनी प्राणीमित्र,वन्यजीव संरक्षक आनंद मढवी यांना याची कल्पना दिली.याबाबत आनंद मढवी आपले सहकारी पंकज घरत,सुमित मढवी यांच्यासह घटनास्थळी गेले.परिस्थितीची पाहणी करून यांनी तालुका वनधिकारी शशांक कदम यांच्याशी संपर्क केला .सकाळी तालुका वनाधिकारी शशांक कदम,वनक्षेत्रपाल डी डी पाटील यांनी चिर्ले येथे घटनास्थळी येऊन पंचनामा करून बिबट्याच्या भीतीने नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले.
आपण जंगलांवर अतिक्रमण केल्यानेच बिबट्या सारख्या प्राण्याला शिकारीच्या शोधात गावात यावे लागले.आपण प्राणी पक्षांची घरे सुरक्षित ठेवली तरच या जंगली श्वापदांपासून आपण सुरक्षित राहू
– आनंद मढवी, प्राणीमित्र व वन्यजीव संरक्षक
चिर्ले गावात नागरी वस्तीत बिबटया येणे ही गंभीर बाब असून जंगलात बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करून संरक्षित जंगलात नेण्यात येईल.जनतेने घाबरून जाऊ नये.
– शशांक कदम,तालुका वनाधिकारी,उरण





























































