ई-फार्मसी ऑर्डर घेऊ शकतात, औषधांचा साठा करू शकत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱया ई-फार्मसी फक्त औषधांची ऑर्डर घेऊ शकतात, त्यांना औषधांचा साठा करता येणार नाही. औषधांचा साठा करण्याचे काम घाऊक विक्रेत्यांचेच आहे. घाऊक विक्रेत्यांबरोबर एकत्रितपणे काम करूनच ई-फार्मसींना ग्राहकांना औषधे पोहोचवता येतील, असे केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य खात्याने ई-फार्मसी कायद्यात बदल केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात ऑनलाइन औषध विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर ई-फार्मसी कायदा बनवण्यात आला आहे. देशभरात 50 ई-फार्मसी कार्यरत असून जवळपास आठ लाख घाऊक औषध विक्रेते आहेत. या दोघांशीही चर्चा करून कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे.

दुकानदार थेट घरी औषधे पोहोचवणार
कायद्यातील नवीन सुधारणेनुसार आता स्थानिक पातळीवरील औषधे विक्रेते दुकानदार ग्राहकांना थेट घरी जाऊन औषधे देऊ शकतील. अशा प्रकारे थेट ग्राहकांच्या घरी जाऊन औषधे पोहोचवणे या आधी बेकायदा होते, मात्र आता ते कायदेशीर मानले जाईल.

प्रिक्रिप्शनशिवाय औषधे मिळणार नाहीत!
ग्राहकाने दिलेले औषधांचे प्रिक्रिप्शनही जपून ठेवावे लागणार आहे. डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणेच औषधे द्यावी लागणार आहेत. विशेष करून ऍण्टीबायोटिक्सची औषधे प्रिक्रिप्शनशिवाय देता येणार नाहीत.