
केंद्र सरकारमधील ‘ब’ आणि ‘क’ प्रवर्गातील (non gazette posts) पदभरती आता गुणवत्तेनुसार होणार आहेत. ही पदे ‘सीईटी’ परीक्षेद्वारे भरण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. सरकारी आकडेवारीनुसार ‘क’ प्रवर्गातील 5 लाख 74 हजार 289 तर ‘ब’ प्रवर्गातील 89 हजार 638 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची निवड ही सीईटीद्वारे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असून ही परीक्षा घेण्यासाठी विशेष एजन्सीची नेमणूकही करण्यात येणार आहे.
सीईटी घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष एजन्सीने केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी तांत्रिक पदे भरण्यासाठी सीईटी परीक्षा घ्यायची आहे. सध्या या पदांवरील भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), रिजनल रूरल बॅक (आरआरबी) आणि इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) च्या माध्यमातून होत आहे. या प्रस्तावावर लवकरच देशातील नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारमधील रिक्त पदे
‘अ’ प्रवर्ग 19 हजार 896
‘ब’ प्रवर्ग 89 हजार 638
‘क’ प्रवर्ग 5 लाख 74 हजार 289
एकूण 6 लाख 83 हजार 823
(दरवर्षी सुमारे 2.5 कोटी उमेदवार 1.5 लाख रिक्त पदांसाठी विविध परीक्षांमार्फत सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात.)
सीईटी प्रस्तावातील वैशिष्टय़े
ऑनलाइन परीक्षा नोंदणी. पदवीधारक तसेच अकरावी, बारावी पास आणि दहावी पास उमेदवारांसाठी वेगवेगळी सीईटी.
सीईटीमध्ये उमेदवाराने मिळवलेले गुण विविध भरती एजन्सीला उपलब्ध होतील. सीईटी निकालाच्या आधारे उमेदवार पुढील तीन वर्षे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी पात्र असेल.
सीईटीतील गुणसंख्या सुधारण्यासाठी दोन अतिरिक्त संधी. सर्वाधिक गुणांच्या आधारे नोकरीसाठी पात्र ठरता येईल.






















































