
देशभरातील पोलिस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन पुण्यातील बाणेर परिसरातील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेत करण्यात आले आहे. या परिषदेस मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख वाय. के. जेठवा यांनी आज शहरात येऊन सुरक्षिततेचा आढावा घेतला. 7 व 8 डिसेंबर असे दोन दिवस पंतप्रधान पुण्यात मुक्कामी राहणार आहेत.
पोलीस महासंचालकांची परिषद पुण्यात होत असून या परिषदेला पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री शहा उपस्थित राहणार आहेत. बाणेर परिसरातील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेत 6 ते 8 डिसेंबरला परिषद होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार यांनीही परिषद होणाऱ्या ठिकाणाची पाहणी करुन सुरक्षा यंत्रणांना सुचना दिल्या होत्या. त्यांच्यासोबत पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल, पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम उपस्थित होते. ही परिषद शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
तीन दिवसांच्या या परिषदेत देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा आढाव्यासह इतर विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या परिषदेत राषट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह 180 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिषदेत मार्गदर्शन करतील. परिषदेच्या नियोजनाची जबाबदारी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्यावर आहे.
पंतप्रधानांसह गृहमंत्र्याचा मुक्काम राजभवनात
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या निवासाची व्यवस्था राजभवनात केली जाण्याची शक्यता आहे. तसेच सुरक्षेच्या पाश्र्वभुमीवर स्पेशल प्रोटेक्शन गु्रपचे (एसपीजी) अधिकाऱ्यासह कमांडोची पथके शहरात दाखल होणार आहेत.त्यांच्याकडून कार्यक्रस्थळासह, पंतप्रधानांच्या प्रवास मार्गासह वास्तव्याची तपासणी करण्यात येणार आहे.



























































