खातेधारकाला 50 पैशांसाठी नोटीस धाडणे एसबीआयला महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

अवघ्या 50 पैशांसाठी राजस्थानमधील एका जनधन खातेदाराला एसबीआय बँकेने कायदेशीर नोटीस धाडल्याचा अजब प्रकार घडला आहे. जन-धन खात्यात शनिवारपर्यंत 50 पैसे जमा न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच या नोटीसद्वारे दिला. दरम्यान, पैसे जमा करायला गेलेल्या खातेदारकाकडून एसबीआयच्या अधिकाऱयांनी पैसेच जमा करून न घेतल्याने खातेधारकानेच आता बँकेला कोर्टात खेचले आहे.

राजस्थानातील झुंझूनूमधील शाखेत जितेंद्र कुमारांचे जनधन खाते आहे. त्यांच्या खात्यात सध्या 124 रुपये आहेत. शनिवारी रात्री त्यांना बँकेकडून नोटीस आली. लोकअदालतमध्ये येऊन 50 पैसे जमा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. वैद्यकीय समस्येमुळे जितेंद्र यांच्याऐवजी त्यांचे वडील विनोद सिंग लोकअदालतमध्ये पैसे भरण्यासाठी पोहोचले. दिवसभर विनोद सिंग यांनी लोकअदालतमध्ये चकरा मारूनही अधिकाऱयांनी त्यांच्याकडून पैसे स्वीकारले नाहीत. याप्रकरणी आता खातेधारकानेच बँकेविरुद्ध मानहानीचा दावा केल्याची माहिती खातेधारकाचे वकील विक्रम सिंग यांनी दिली आहे.