उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार दोषी, बुधवारी शिक्षा सुनावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. बुधवारी त्याला या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. न्यायाधीशांनी ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत दोषी ठरवताच सेंगर याला रडू फुटले.

भाजपचा तत्कालीन आमदार कुलदीपसिंह सेंगर व त्याच्या सहकाऱयांनी 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणात सेंगरसह इतरांवर आपराधिक षड्यंत्र, अपहरण, बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याची सुनावणी चालू असतानाच जुलैमध्ये पीडितेच्या कारला एका ट्रकने जबर धडक दिली. यात पीडिता गंभीर जखमी असून ती तेव्हापासून दिल्लीच्या एम्समध्येच दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा खटला दिल्लीला हलवण्यात आला. बंद खोलीत या प्रकरणाची सुनावणी झाली. एकूण 22 साक्षीदार तपासण्यात आले. तीस हजारी न्यायालयाचे न्या. धर्मेश शर्मा यांनी 10 डिसेंबर रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता.

न्या. धर्मेश शर्मा याला ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत दोषी ठरवले. या कायद्यानुसार जन्मठेप होते. न्यायालयाचा निकाल ऐकताच कुलदीपसिंह सेंगर हा धाय मोकलून रडू लागला. निकाल देत असतानाच न्यायालयाने सीबीआयच्या वेळकाढूपणावरही बोट ठेवले.