
सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या यजमान हिंदुस्थानने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर 107 धावांनी रुबाबदार विजय मिळवला. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांची दणकेबाज शतके आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची हॅटट्रिक ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. ‘टीम इंडिया’ने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधून आव्हान शाबूत ठेवले. 159 धावांची धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा या सामन्याचा मानकरी ठरला.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 387 धावांचा महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव 43.3 षटकांत 280 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून सलामीवीर इविन लेविस (30), शाई होप (78), निकोलस पूरन (75), किमो पॉल (46) व तळाला पदार्पणवीर खॅरी पियर (21) यांनी हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमी व कुलदीप यादव यांनी 3-3 फलंदाज बाद केले. रवींद्र जाडेजाने 2 व शार्दुल ठाकूरने 1 बळी मिळवला.
227 धावांची खणखणीत सलामी
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने 5 बाद 387 धाकांचा डोंगर उभारला. रोहित शर्मा व लोकेश राहुल या सलामीवीरांच्या झंझावातात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. दोघांनी 36.6 षटकांत 227 धाकांची खणखणीत सलामी दिली. अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल 102 धावावंर बाद झाला. रोस्टन चेसने त्याचा झेल टिपला. लोकेश राहुलने 104 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार व 8 चौकारांसह 102 धाकांची खेळी साकारली. हे त्याचे तिसरे वन डे शतक ठरले. त्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार विराट कोहली कायरॉन पोलार्डच्या गोलंदाजीवर शून्यावरच बाद झाला.
ऐतिहासिक हॅटट्रिक
कुलदीप यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक घेणार हिंदुस्थानचा पहिला, तर क्रिकेटविश्वातील सहावा गोलंदाज ठरला. कुलदीपने 33 व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर लागोपाठ बळी मिळवले. चौथ्या चेंडूवर त्याने शाई होपला (78) कोहलीकरवी झेलबाद केले. पाचव्या चेंडूवर जेसन व्होल्डरला (11) यष्टीमागे पंतकरवी, तर पुढच्याच चेंडूवर आलेल्या अल्झारी जोसेफला (0) केदारकरवी झेलबाद केले. कुलदीपने 2017 साली कोलकात्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली हॅटट्रिक नोंदविली होती.
28 वे दमदार शतक
रोहित शर्माने वन डे कारकीर्दीतील 28 वे दमदार शतक झळककले. त्याने 138 चेंडूंत 5 गगनभेदी षटकार व 17 नेत्रदीपक चौकारांची आतषबाजी करताना 159 धावांची संस्मरणीय खेळी साकारली. शेल्डॉन कॉटरेलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. शाई होपने त्याचा झेल टिपला.
श्रेयस-रिषभची जोडी जमली
श्रेयस अय्यर व रिषभ पंत या जोडीने चौथ्या किकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. दोघांनी वेगवान फटकेबाजी करताना वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना जबरदस्त तडाखा दिला. श्रेयस अय्यरने 32 चेंडूंत 4 षटकार व 3 चौकारांसह 53 धावांची आणि रिषभ पंतने 4 षटकार व 3 चौकारांसह 39 धावांची खेळी साकारली. केदार जाधवने नाबाद 16 धावा तडकावल्या.
दृष्टिक्षेपात
रोहित शर्माने एका वर्षात सात शतके झळकावण्याचा पराक्रम केला. याआधी सौरभ गांगुलीने 2000 साली व डेव्हिड वॉर्नरने 2016 साली एका वर्षात सात शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने एका वर्षात सर्वाधिक नऊ शतके करण्याचा विक्रम केलाय.
रोहित शर्मा व लोकेश राहुल या सलामी जोडीने 17 वर्षांपूर्कीचा सौरभ गांगुली व वीरेंद्र सेहवाग जोडीचा विक्रम मोडीत काढला. सौरभ गांगुली व वीरेंद्र सेहवाग जोडीने 2002 साली राजकोट येथे वेस्ट इंडीजकिरुद्धच्या लढतीत 196 धावांची भागीदारी केली होती. रोहित शर्मा व लोकेश राहुलने बुधवारी 227 धावांची भागीदारी केली.
विराट कोहलीने विशाखापट्टणम वन डेसाठी मैदानात पाऊल ठेवताच नवा किक्रम नोंदवला गेला. 400 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा तो आठवा हिंदुस्थानी खेळाडू ठरलाय. तसेच जगामध्ये अशी कामगिरी करणारा तो 33 वा क्रिकेटपटू ठरलाय.
सामनावीर – रोहित शर्मा
धावा 159 – षटकार 5, चौकार 17



























































