#Nirbhaya दोषी पवन गुप्ताची याचिका फेटाळली, दिशाभूल केली म्हणून वकिलालाही दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची अल्पवयीन असल्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. निर्भया प्रकरण घडलं तेव्हा आपण अल्पवयीन होतो, असा दावा पवन कुमारने केला होता. मात्र, त्याची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे, तर पवनचे वकील ए. पी. सिंग यांना कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी 25 हजारांचा दंडही ठोठावला आहे.

पवन कुमार गुप्ता याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबर, 2012 रोजी ही घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन होतो असा दावा पवनने केला होता. या घटनेनंतर ऑसिफिकेशन टेस्ट (हाडांच्या घनतेची चाचणी) झाली नव्हती आणि या गोष्टीचा फायदा मिळायला हवा, असे पवनने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर निर्भयाच्या आईनेही आक्षेप घेतला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, फक्त शिक्षेपासून वाचण्यासाठी आणि या प्रक्रियेला विलंब करण्यासाठीच ही याचिका केली गेली होती.

या याचिकेवर सुनावणी करत दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच, पवनचे वकील ए. पी. सिंग यांना न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी 25 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. तसेच, कोर्टाने बार काउन्सिलला ए. पी. सिंग यांनी दोषीच्या वयासंबंधीची खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय?
ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे हाडांच्या घनतेची चाचणी होय. मानवाच्या वयाच्या विविध टप्प्यांवर हाडांची घनता निरनिराळी असते. हाडांच्या घनतेवरून मानवाच्या वयाचे निदान होऊ शकते. आरोपी अल्पवयीन आहे अथवा नाही हे देखील या चाचणीतून स्पष्ट होऊ शकते.