ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात तीव्र आंदोलन, मैदानात बॉलीवूड सेलिब्रिटीही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात देशभरात वणवा पेटला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलने, दगडफेक, जाळपोळ होत आहे. महाराष्ट्रातही चांद्यापासून बांद्यापर्यंत या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. मुंबईसह पुणे, मालेगाव, नगर, नागपूर, संभाजीनगर, सोलापूर, धाराशीवमध्ये आज हजारो आंदोलकांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा जाहीर निषेध नोंदवला. बॉलीवूडमधील कलाकारांसह अनेक सेलिब्रिटीही या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘नही डरे थे गोरो से…अब क्या डरेंगे चोरो से’ अशा घोषणा देत आंदोलकांनी  धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करू पाहणाऱया केंद्र सरकारचा जोरदार धिक्कार केला.  मुंबईच्या ऑगस्ट क्रांति मैदानात हजारो मुंबईकर जमले होते. एकीकडे आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना मुंबईकरांनी मात्र संयम बाळगून अत्यंत शांतपणे आपले निषेध आंदोलन केले.

ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनात बॉलीवूड सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. अभिनेता राहुल बोस, अनुराग कश्यप, हुमा कुरेशी, स्वरा भास्कर, दानिश हुसैन, अर्जुन माथूर, जावेद जाफरी, फरहान अख्तर, सुशांत सिंग, निर्माता आनंद पटवर्धन, महेश भट, दिग्दर्शक कबीर खान, त्याची पत्नी मिनी माथूर, नीरज घायवन, निखिल अडवाणी, राकेश मेहरा, अनुभव सिन्हा, राज बब्बर, सईद मिर्झा, सुहासिनी मुळ्ये, सुधींद्र कुलकर्णी, तिस्ता सेटलवाड आदी सेलिब्रिटींनी या आंदोलनात भाग घेऊन केंद्राच्या ‘तानाशाही’वर हल्लाबोल केला. तत्पूर्वी अनेक सेलिब्रिटींनी ‘फक्त सोशल मीडियावरून निषेध करून चालणार नाही, रस्त्यावर उतरा’ असे ट्विट करून मुंबईकरांना या आंदोलनात उतरण्याचे आवाहन केले होते.

दक्षिण मुंबईत वाहतुकीची प्रचंड कोंडी

या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ग्रँट रोडच्या नाना चौक, केम्स कॉर्नर परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहतूक केनेडी ब्रिज, सिसिल जंक्शन येथून वळवण्यात आली होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणारी वाहतूक बंद करावी लागली.

‘हिंदू-मुस्लिम एक है…मोदी-शहा फेक है’

‘नही चाहिए नही चाहिए…एनआरसी नही चाहिए’, ‘हिंदू मुस्लिम एक है…मोदी-शहा फेक है’, ‘मोदी-शहा…चले जाव’, ‘सब ताज उछाले जायेंगे…सब तख्त गिराए जायेंगे’, ‘स्टॉप डिव्हायडींग इंडिया’, ‘किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है’ अशा घोषणांनी ऑगस्ट क्रांती मैदानाचा परिसर आंदोलकांनी दुमदुमवून टाकला. संपूर्ण मैदान भरगच्च गर्दीने व्यापल्याने आंदोलकांनी ठिकठिकाणी जमावाने उभे राहून केंद्र सरकारविरुध्द घोषणाबाजी केली.

नागपुरात मोर्चा

एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुस्लिम बांधवांनी आज विराट मोर्चाद्वारे विधान भवनावर धडक दिली. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. हजारोंच्या संख्येने सहभागी मोर्चेकऱयांनी केंद्र सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला. ‘हक है हमारा आजादी, छिन के लेंगे आजादी’च्या घोषणांनी उपराजधानी दणाणून गेली होती. 5 टक्के आरक्षणाची मागणीही मोर्चेकऱयांनी बुलंद केली. जमात ऐ इस्मामी हिंद आणि भारतीय मुस्लिम परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोर्चाला महालातील चिटणीस पार्क येथून प्रारंभ झाला.

Mumbai: Bollywood actor Farhan Akhtar during a protest against the Amended Citizenship Act and NRC, at August Kranti Maidan in Mumbai, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo)(PTI12_19_2019_000335B)