शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्याचे निर्देश विमा कंपन्यांना द्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करावा आणि तत्काळ मदत देण्याबाबत निर्देश द्यावेत. विमा  कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्याने रब्बी हंगाम 2019 साठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2020 पर्यंत वाढवावी. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी निर्देश द्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, ‘क्यार’ व ‘महावादळ’ आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकर्‍यांना पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना या बाबीचा आढावा घेण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादन आणि निर्यातीत अग्रेसर आहे. कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर असलेले राज्य आहे. शेती क्षेत्रापैकी 82 टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पर्यावरणातील बदल कृषी उत्पादनावर परिणाम करण्याबरोबर शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खालावण्यासदेखील कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे.

पर्यावरणातील बदलांमुळे पिकांवर परिणाम

शेतकर्‍यांना पीकहानीच्या जोखमीपासून संरक्षण देण्यासाठी पीक विमा  महत्त्वाचा ठरतो. राज्याने प्रधानमंत्री फसल बिमा योजनेची 2016 पासून प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल पीक विमा  कंपन्यांना देण्यात आला आहे. कृषिमंत्र्यांनी या बाबीचा आढावा घेऊन कंपन्यांना तत्काळ पीक किम्याची प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत.

शेतकरी विमा कवचापासून वंचित राहील

रब्बी हंगाम 2019 बाबत विमा  कंपन्याची भूमिका उदासीनतेची असून 10 जिल्ह्यांमध्ये वारंवार निविदा प्रक्रिया करूनदेखील विमा  कंपन्यांनी सहभाग  न घेतल्याने त्या जिल्ह्यातील शेतकरी विम्याच्या सुरक्षा कवचापासून वंचित राहतील. कृषिमंत्र्यांनी विमा  कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना कराव्यात. विमा  कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्याने निवडीस उशीर झाल्याने रब्बी हंगामासाठी निवडीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2020 पर्यंत वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केले आहे.