
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन 21 दिवसच झाले आहेत. पिकाची वर्गवारी करण्याचे आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आमचे सरकार राज्यातील शेतकऱयांचे भलेच करणार आहे. शेतकऱयांसाठी राज्याचा गल्ला रिकामा झाला तरी चालेल, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार शेतकऱयांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना गुलाबराव पाटील यांनी अस्सल ग्रामीण बाजात भाषण केले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. मुनगंटीवार यांनी या प्रस्तावावर भाषण करताना सरकारवर टीका केली होती. 93 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना मदत करण्याचे आश्वासन कधी पूर्ण करणार, असा प्रश्न केला होता. या चर्चेत भाग घेताना गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर दिले. गुलाबराव पाटील यांच्या भाषणात भाजपचे सदस्य वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावर सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सरकार म्हणून योग्य निर्णय घेऊ. प्रत्येक वाक्यवर अडथळा आणणे योग्य नाही, अशा शब्दांत प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचा दणका आणि रक्कम जमा
त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी भाषण करताना भाजपच्या आरोपाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, या सरकारला शेतकऱयांची चिंता आहे. पीकविम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यावर मोर्चा काढला. शिवसेनेने दणका देताच संध्याकाळी विम्याचे पैसे खात्यात जमा झाले याची आठवणही पाटील यांनी यावेळी करून दिली.
मुख्यमंत्री त्यागी घराण्यातील
आमच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱयांना तातडीने मदत देतील. उद्धव ठाकरे राजकारणी नाहीत. ते त्यागी घराण्यातून आले आहेत. शेतकऱयांचे भले होईल असे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत तुम्हाला मिळेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.




























































