शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायची याचा अभ्यास सुरू – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शेतकऱयांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत. कर्जमाफी कशा पद्धतीने द्यायची याचा अभ्यास सुरू आहे. राजस्थान, मध्य प्रदेश अशा राज्यांतील कर्जमाफी योजनेचा आढावा वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. आधारसोबत लिंक करून कर्जमाफी देता येईल का याची चाचपणी सुरू आहे. फडणवीस सरकारची कर्जमाफी तीन वर्षे रेंगाळली होती तसे होऊ देणार नाही. तीन महिन्यांत योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करून विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

‘सुयोग’ येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय लवकरच होईल. पावसाळ्यापूर्वी, लागवडीपूर्वी शेतकऱयाच्या हातात पैसे पडतील असा प्रयत्न राहणार आहे.जेव्हा 2014 साली भाजप सत्तेत आली तेव्हा सुरुवातीला काही महिने आम्ही सरकारला संधी दिली. आताच्या विरोधकांकडून तसे होताना दिसत नाही. एकीकडे भाजप नेते शिवसेनेला भावनिक साद घालत आहेत. पुन्हा युती होईल असा आशावाद जागवत आहेत, तर दुसरीकडे थेट व्यक्तिगत टीकाही करतायत. व्यक्तिगत टीका करून कशी जवळीक साधणार त्यांनाच माहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

माझ्या मंत्रीपदाबाबत पवारसाहेबच निर्णय घेतील

सध्याचे जे खातेवाटप झाले आहे तेच पुढे चालू राहील. एखाद् दुसऱयाच खात्यात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या जी खाती ज्या पक्षाकडे आहेत तशीच पुढे राहतील. अर्थात हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे सांगून ते म्हणाले, अधिवेशन संपल्यानंतर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल. याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील. आपल्याला उपमुख्यमंत्रीपद अथवा महत्त्वाचे खाते मिळणार का यावर शरद पवारच याबाबत निर्णय घेतील असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.