
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे.नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी महिलांवरील अत्याचार कसे रोखता येतील यावर आपले मत मांडले. ‘पूर्वी घराघरांमध्ये कन्यापूजन केले जात होते, पण आता देशात काय घडतंय? दुष्ट प्रवृत्तींकडून महिलांवर बलात्कार आणि खून केले जात आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी?’ असा सवाल करतानाच अशा वाईट घटना रोखण्यासाठी मुलांना संस्कृत शिकवा, असे राज्यपाल म्हणाले.
प्रशासकीय भवनासाठी आर्थिक मदत करणाऱ्या बजाज कुटुंबीयांचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी आभार मानले. याप्रसंगी बजाज इलेक्ट्रिकल्सचे शेखर बजाज आदी मान्यवर उपस्थित होते. चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, ज्ञानाचा वापर आणि गैरवापर तसेच सत्ता आणि पैसा या विषयांवरही राज्यपाल कोश्यारी यांनी आपले मत यावेळी मांडले.



























































