सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आता निवडणूक अधिकाऱ्यांचे पॅनेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील (ज्या संस्थांची सभासद संख्या 250 पेक्षा कमी) सहकारी संस्थांच्या निवडणुका संबंधित संस्थांना घेता येणार आहेत. त्यासाठी त्रयस्थ निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पात्र व्यक्तींचे निवडणूक अधिकारी म्हणून स्वतंत्र पॅनेल तयार करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक प्राधिकरण सहकार विभागाच्या माध्यमातून घेत होते, मात्र सहकारी संस्थांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त असून त्यामध्ये हौसिंग सोसायटय़ा अधिक आहेत. त्यामुळे येणारा निवडणूक कामाचा ताण कमी करण्यासाठी छोटय़ा संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार संबंधित संस्थांना दिला आहे. त्यासाठी आधी निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागणार आहे. त्याची दखल घेत सहकार विभागाने शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी, सहकार विभागातील निवृत्त वरिष्ठ लिपिकापेक्षा वरील कर्मचारी, वकील यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यांचे पॅनेल तयार केले जाणार आहे.