
मुंबईत वर्षभरात अग्निसुरक्षा, आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱया 6 हजार 282 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे तर 208 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून या कारवाईदरम्यान 9 हजार 921 सिलिंडर्स जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
मुंबईतील अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱया हॉटेल्स, रहिवासी, व्यावसायिक इमारती आणि आस्थापनांवर जानेवारी ते 20 डिसेंबरपर्यंच्या कारवाईचा तपशील अग्निशमन दलाने दिला आहे. मुंबईतील 10 हजार 800 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. त्यावेळी केलेल्या तपासणीत 6 हजार 282 हॉटेल्सनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी बेकायदा वापरण्यात येणारी 9 हजार 921 सिलिंडर्स जप्त करण्यात आली. अग्निसुरक्षा आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱया 208 इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी नोटिसा बजावूनही अग्निसुरक्षेची काळजी न घेणाऱया 59 इमारती आणि आस्थापनांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
‘गार्डन हाऊस’ला ना-हरकत प्रमाणपत्र नाही
गेट वे ऑफ इंडियातील गार्डन हाऊस या हॉटेलमधील तळमजल्याला अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र आहे, मात्र पहिला ते पाचव्या मजल्यापर्यंत अग्निसुरक्षा असूनही अग्निसुरक्षेचे ना हरकत प्रमाणपत्र मात्र नाही. त्याबद्दल आरोग्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कळवण्यात आले आहे. 1 ते 5 मजले अनधिकृत असल्यामुळे एमआरटीपी कायद्याने कारवाई करण्यात येत होती, मात्र याबाबत न्यायालयात खटला सुरू असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, कमला मिल दुर्घटनेनंतर कंपाऊंडमधील बंद करण्यात आलेली दोन्ही हॉटेल्स अजूनही बंदच आहेत, असे अग्निशमन दलाने म्हटले आहे.




























































