कुलाब्यातील गेस्ट हाऊसवर समाजसेवा शाखेची कारवाई, देहविक्रयप्रकरणी तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजसेवा शाखेने कुलाबा येथील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून तीनजणींची सुटका केली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या प्रकरणी तिघांना अटक करून कुलाबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुलाबा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रय रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ यांच्या पथकाने गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकला. पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या मॅनेजर, वेटर व एका ग्राहकाला अटक केली. गेल्या पाच महिन्यांपासून या गेस्ट हाऊसमध्ये हे रॅकेट सुरू होते. एक महिला या गेस्ट हाऊसच्या मालकाच्या संपर्कात होती. त्या गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रयसाठी येणाऱयाच्या ते नोंदी करत नसायचे. पोलिसांनी कारवाई करून 11 हजार रोख आणि 6 मोबाईल जप्त केले. कुलाबा पोलिसांनी ‘पोस्को’, ‘पिटा’ कायद्यानुसार तिघांना अटक करून न्यायालयात नेले.

जेवण बनवण्यावरून विवाहितेची हत्या
जेवण बनवण्याच्या कारणातून परळ येथे विवाहितेची हत्या झाल्याची घटना घडली. संतापलेल्या पती अजयने डोके भिंतीवर आपटल्याने त्यातच पत्नीचा मृत्यू झाला. भोईवाडा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. सविता अजय अडसूळ असे मृत विवाहितेचे नाव आहे. सविता या पती व दोन मुलांसह परळच्या चमारबागवाला लेन येथील महालक्ष्मी इमारतीत राहत होत्या. शुक्रवारी महालक्ष्मी इमारतीत कार्यक्रम होता. तेथे बनवलेले जेवण घेऊन ते घरी गेले. घरी गेल्यानंतर दोघांमध्ये जेवण बनवण्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्या वेळी संतापाच्या भरात अजयने सविता यांचे डोके भिंतीवर आपटले. सविता या रक्ताच्या थारोळ्यात पडताच अजयने त्यांना उचलून केईएम रुग्णालय गाठले. पण दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सविता यांना मृत घोषित केले.