
चारकोप-कांदिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नगर वसाहतीतील रहिवाशांना अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी म्हाडातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईला गृहनिर्माणमंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.
चारकोप सेक्टर क्रमांक-1 व 2 ही म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत येणारी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 160 बैठय़ा सहकारी गृहनिर्माण संस्था असून यामध्ये 600 कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. सन 1988 मध्ये या जमिनीवर सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सदनिकांचे बांधकाम करण्यात आले, मात्र म्हाडातर्फे येथील वाढीव बांधकाम तोडण्याची नोटीस बजावण्यात आल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी सभापती विनोद घोसाळकर, नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या शिष्टमंडळाने गृहनिर्माणमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली. याची दखल घेत प्रबोधनकार ठाकरे वसाहतीतील रहिवाशांनी केलेले वाढीव बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश गृहनिर्माणमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुनर्विकासासंदर्भात लवकरच बैठक
गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर या म्हाडाच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर प्रबोधनकार ठाकरे नगर वसाहतीचा पुनर्विकास करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यासंदर्भात लवकरच बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री पाटील यांनी दिले आहे.



























































