मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचे दुरुस्ती काम अखेर पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर पावसाने दरड कोसळून बांधच वाहून गेल्याने मंकी हिल ते नागनाथ दरम्यान सुरू असलेले तिसऱया मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम आता संपत आले आहे. त्यामुळे या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक हळूहळू सुरू करण्यात येणार आहे. 15 जानेवारी 2020 या मुदतीआधी या अप मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांना यश आले आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे मुंबई ते पुणे मार्गावर जागोजागी मोठी पडझड झाल्याने रेल्वे वाहतुकीला जबर फटका बसला. भोर घाटात मंकी हिल ते नागनाथ दरम्यान पावसाने रूळ उखडण्याबरोबरच रुळाखालच्या खडीसह 30 मीटरचा मातीचा बंधाराच वाहून गेला. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक बंद पडली. मुंबईच्या दिशेने जाणारा अप मार्ग बंद झाल्यामुळे मध्य रेल्वेने बंधारा बांधण्याऐवजी तेथे गर्डर टाकून पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील इतर भागातील काम पूर्ण झाले. परंतु मंकी हिल ते नागनाथ स्थानका दरम्यानचे काम पाऊस लांबल्याने रखडले होते. 6 नोव्हेंबरपासून मंकी हिल ते नागनाथ दरम्यानच्या कामाला हळूहळू सुरुवात झाली. हे काम रखडल्याने 15 जानेवारी 2020नंतरच अप मार्गिका सुरू करण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली होती. मंकी हिल ते नागनाथ पट्टय़ात बांधण्यात येणाऱया पुलासाठी तेथे 100 टनाचे दोन स्पॅन गर्डर वाहून नेण्याचे मोठे आव्हान होते. या पट्टय़ात रस्ते मार्ग नसल्याने 70 टनांच्या दोन क्रेनसह इतर साधनसामुग्रीची वाहतूक करण्याचे जिकिरीचे काम होते. सिमेंट काँक्रीटचे मिक्सर वॅगनवरून वाहून आणताना सिमेंट वाळू नये यासाठी खास तंत्र वापरण्यात आले. बोगद्याचे छत टेकत असल्याने क्रेनचे टायर काढून तिला घटनास्थळी आणण्यात आले.

– मध्य रेल्वेच्या 40 कामगारांनी दिवसाचे 24 तास काम करीत हा पूल वेळेआधीच तयार केल्याने हळूहळू या मार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक पूर्ववत होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

वेळापत्रक पूर्ववत होणार
या अप मार्गिकेवरून दररोज 30 मेल-एक्सप्रेस धावतात. मात्र दुरुस्ती कामामुळे या गाडय़ा अन्य दोन मार्गिकांवरून वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गिकांवरील ताण वाढला होता. त्यातच मालगाडय़ांची वाहतूकही याच मार्गावरून होत असल्याने लांब पल्ल्याची वाहतूक बाधित झाली होती. ती आता हळूहळू पूर्ववत होणार आहे.