वेळ अमावस्या चोरट्यांना पावली, घरफोडी करून लाखोंचा माल लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्येचा सण साजरा करण्यासाठी घर बंद करुन गेल्यानंतर चोरट्यांनी घरे फोडली. लातूर शहरात एक घर फोडण्यात आले तर औसा शहरात 3 घरे फोडली. चाकूर तालूक्यातील नागेशवाडी येथेही एक बंद घर फोडण्यात आले. ही सर्व घरे चोरट्यांनी भरदिवसा फोडली आहेत.

वेळ अमावस्येच्या कारणाने लातूरातील घर बंद करुन गावाकडे गेल्यानंतर चोरट्यांनी लातूरातील घर फोडल्याची घटना घडली. सुमारे 21 तोळ्याचे सोन्याचे दागीने आणि रोख 40 हजार रुपये असा ऐवज पळवण्यात आला. या चोरी प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जयराम चंदू राठोड  यांनी तक्रार दाखल केली. वेळ अमावस्येच्या निमित्ताने राठोड हे आपल्या मुळगावी होदलूर ता.आळंद येथे गेले होते. लातूरातील घराला कुलूप लाऊन गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि रोख 40 हजार रुपयांचा ऐवज पळवला. रात्री घरी आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा शहरातील श्रीनिवास नगर भागातील 3 घरेही चोरट्यांनी दिवसा फोडली आहे. सर्व चोर्‍यांचे मिळून लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी लांबवला आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.