मुलुंडमध्ये जॉगिंग करणाऱ्या महिलेचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडपासून विक्रोळीपर्यंत सर्व्हीस रोडवर असंख्य नागरिक जॉगिंगसाठी किंवा व्यायामासाठी येत असतात. 13 डिसेंबर रोजी एक महिला संध्याकाळी याच मार्गावर जॉगिंग करत होती. मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने आजूबाजूला कोणी नाही असं पाहून या महिलेचा विनंयभंग केला आणि पळून गेला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या घाटकोपर इथल्या गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. अमन शेख असं या आरोपीचं नाव आहे.

ही महिला जॉगिंग करत असताना ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या अमन शेखची तिच्यावर नजर पडली. त्याने रस्त्याच्या कडेला त्याची स्कूटर थांबवली आणि या महिलेला नको तिथे स्पर्श केला आणि थोडं अंतर पुढे जाऊन थांबला. पीडीत महिलेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमनने महिलेकडे पाहून घाणेरडे अंगविक्षेप केले आणि पळून गेला. महिलेने पोलिसांत तक्रार केली तेव्हा तिने तिला लक्षात असलेला पण अर्धवट स्कूटरचा नंबर सांगितला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पूर्ण नंबर शोधून काढला आणि त्याआधारे अमनचा पत्ता शोधून काढला. अमनचा पत्ता कुर्ल्यातला असल्याचं समजल्यानंतर पोलीस त्याच्या घरी धडकले. पोलीस घरी गेले तेव्हा अमन घरी नव्हता. अनेकदा प्रयत्न करूनही अमन घरी न सापडल्याने पोलिसांना सापळा रचून त्याला उचलला आणि अटक केली.