
सहा वेळची जगज्जेती बॉक्सर एमसी मेरी कोम हिने शनिवारी बहुचर्चित लढतीत निखत झरीनचा पराभव करून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. मात्र झरीनचा धुव्वा उडवल्यानंतरही राग शांत न झालेल्या मेरी कोमने तिच्याशी हात मिळविण्यास नकार दिला. त्यामुळे मेरी कोम-झरीन यांच्यातील वाद आता नवे वळण घेण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये आगामी वर्षी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे तिकीट बुक करण्यासाठी महिलांच्या 51 किलो गटात झालेल्या बॉक्सिंग लढतीत मेरी कोमने अंतिम फेरीत निखत झरीनचा 9-1 गुणफरकाने धुव्वा उडवून आपल्याला सहा वेळची जगज्जेती का म्हणतात हे दाखवून दिले. खेळाचा एक शिष्टाचार म्हणून लढतीनंतर उभय प्रतिस्पर्ध्यांमध्ये हात मिळविण्याची प्रथा आहे, मात्र मेरी कोमने विजयानंतर झरीनशी हात मिळवण्यास नकार देत आपल्या मनातील तिच्याबद्दलचा राग अद्याप कायम असल्याचे दाखवून दिले.
दोघींमधील वाद
चीनमध्ये होणाऱया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी हिंदुस्थान बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) मेरी कोमची 51 किलो गटासाठी निवड केली होती, मात्र निखत झरीनने या थेट निवडीवर हरकत घेत मेरी कोमला आव्हान दिले. तिने थेट क्रीडामंत्र्यांना पत्र लिहून मेरी कोममुळे माझ्यावर अन्याय होत असल्याचे सांगत मेरी कोमशी आपण चाचणी लढत खेळायला कधीही तयार आहोत असे म्हटले होते. शिवाय मेरी कोम चाचणीपासून दूर पळते आणि ऑलिम्पिक पात्रतेसाठी दोन हात करण्याची तिची तयारी नाही, असा आरोपही 23 वर्षीय झरीनने पत्रात केला होता, मात्र मेरी कोमने आपण केवळ बॉक्सिंग महासंघाच्या पॉलिसीचे पालन करत असल्याचे म्हटले होते.
साक्षी, सिमरनजीत, लोवलिना, पूजाही पात्र
साक्षी चौधरी हिने 57 किलो गटात सोनिया लॅथरचा 9-1 गुणांनी धुव्वा उडवून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. सिमरनजीत कौरने 60 किलो गटात सरिता देवीला 8-2 फरकाने हरवले. 69 किलो गटात लोवलिना बोर्गोहेन हिने ललिताला 10-0 फरकाने धूळ चारली. 75 किलो गटात पूजा रानीने नूपुरची 10-0 फरकाने दाणादाण उडवून चीनमध्ये आगामी वर्षी होणाऱया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे तिकीट बुक केले.
‘मला झरीनशी हात मिळवायची गरज काय आहे? जेव्हा तुम्ही दुसऱयांकडून सन्मानाची अपेक्षा करता त्याआधी तुम्ही स्वतःही दुसऱयांचा मान ठेवायला शिकले पाहिजे. झरीनने माझा मान ठेवला नाही तर मी का तिच्याशी हस्तांदोलन करू? मला अशी उद्धट वागणारी लोकं आवडत नाहीत. तुम्हाला जे काही सिद्ध करायचे असेल ते रिंगमध्ये करा, रिंगच्या बाहेर नाही.’ – मेरी कोम




























































