
मंत्रीपदाची शपथ घेतल्याने जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीचं पूर्ण भान असून या महाराष्ट्राची सेवा करायची आहे. त्यामुळे मंत्रीपद कोणतं मिळतं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं काम करायचं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांनी शपथविधीनंतर दिली.
शपथविधीनंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. एकाच मंत्रिमंडळात वडील आणि पुत्र आहेत, याविषयी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले. मंत्रिमंडळात वडील आणि पुत्र आहेतच. पण शिवसेना हा माझा परिवार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा हा परिवार असून सर्वांनी एकत्र काम करायचं आहे. मंत्रीपद कोणतं मिळणार याविषयी विचारले असता ते म्हणाले, मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे हे मला काल रात्रीपर्यंतही माहीत नव्हतं. सकाळी मला हे कळलं. मंत्रीपद ठरवणं हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्या खात्याचा मंत्री होतो यापेक्षा महाराष्ट्रासाठी काय चांगलं करता येईल ते काम करणं महत्त्वाचं आहे. शपथेवेळी आईचं नाव घेतल्याबाबत विचारले असता, माझे आजोबा, आजी त्याप्रमाणे आईवडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी त्यांचे नाव घेणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकांमध्ये जल्लोष
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेतो की…’ अशी मंत्रीपदाच्या शपथेची सुरुवात करताच शिवसैनिकांनी ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला. शपथ पूर्ण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आदित्य ठाकरे यांना शुभाशीर्वाद दिले. या वेळी सौ. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हेही उपस्थित होते.
शपथविधी सोहळय़ाचा जल्लोष
शपथविधी सोहळ्यासाठी विधान भवनाच्या प्रांगणात भलामोठा शामियाना उभारण्यात आला होता. हा सोहळा याची देही आणि याची डोळा टिपण्यासाठी नवनियुक्त मंत्र्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने एकच गर्दी केली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धिरज देशमुख यांनाही हा मोह आवरला नाही. सोहळ्यासाठी विधान भवन व मंत्रालयाचा परिसर मोठय़ा प्रमाणावर भगव्या झेंडय़ांबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झेंडय़ांनी फुलला होता. शपथविधीला सुरुवात होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत तसेच हलगी, ढोल-ताशे, लेझीमच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला. तिन्ही पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांनी विधिमंडळाच्या परिसरात तुफान गर्दी केली होती.
























































