उफराटा न्याय; शंभर अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बालकांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी प्रभावीपणे काम करणाऱया जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कंत्राटी कर्मचाऱयांवर आता घरी बसण्याची वेळ आली आहे. कक्षातील जुन्या, अनुभवी कर्मचाऱयांना काढून त्यांच्या जागी नव्याने भरती केली जात आहे. कंत्राटी कर्मचाऱयांचे तीन वर्षांचे कंत्राट संपले तरी ते नियमानुसार दोन वर्षांनी वाढवून देण्याची तरतूद असताना त्याआधीच कर्मचाऱयांना सेवामुक्त करण्यात आले आहे. यामुळे सुमारे 100 कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही नियमबाह्य भरती थांबवून अनुभवी कंत्राटी कर्मचाऱयांची पुन्हा नियुक्ती करावी अशी या कर्मचाऱयांची मागणी असून लवकरच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दाद मागणार आहेत.

कायदे असूनही मुलांवरील अत्याचार रोखण्यात यश येत नाही म्हणून केंद्र सरकारतर्फे ‘एकात्मिक बाल संरक्षण’ योजना आखण्यात आली. ही योजना राज्यस्तरांवर राबवताना 2013 साली प्रत्येक जिह्यात बाल संरक्षण कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यासह 12 कंत्राटी कर्मचारी असतात. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, आऊट रिच वर्कर्स आदींचा समावेश असतो. हे कर्मचारी बालकांच्या संरक्षण आणि पुनर्वसनाचे काम चांगल्या पद्धतीने करीत असून योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. मात्र असे असताना बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱयांना अचानक काढून टाकण्यात आले आहे.

बालकांचे संरक्षण कसे होणार?
राज्यात बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो’च्या रेकॉर्डनुसार गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱया स्थानावर आहे. असे असताना अनुभव नसलेले नवीन कर्मचारी बालकांचे संरक्षण कसे करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्याऐवजी जुन्या कर्मचाऱयांना कंत्राटी पद्धतीने का होईना सेवेत घेऊन त्यांच्याकडून योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.

चुकीचे कार्यमूल्यांकन
काही जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱयांचे कार्यमूल्यांकन करून त्यांना नकारात्मक शेरे देण्यात आले आहेत. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कंत्राटी कर्मचाऱयांचा कार्यमूल्यांकनाचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना असतो. मात्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे कर्मचाऱयांच्या कामांचे मूल्यांकन न करता, जिल्हाधिकाऱयांना काहीही न सांगता परस्पर कर्मचाऱयांना नोकरीतून काढत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बाल संरक्षण कक्ष नेमके काय करते
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या मार्फत पोक्सो, लैंगिक गुह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, बालकामगार, बालविवाह व बालकांसंदर्भातील सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, बालकांचे संरक्षण व पुनर्वसन करणे अशी कामे केली जातात.
 महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये एकात्मिक बाल संरक्षण योजनेची अंमलबजावणी चांगली होत आहे. त्या राज्यांमध्ये 2013 साली नियुक्त झालेले कंत्राटी कर्मचारी अद्याप नोकरीत आहेत.
 महाराष्ट्रात या योजनेतील कार्यक्रम व्यवस्थापक पद 2015 पासून आयसीडीएसच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱयांकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून दिलेला आहे.

पुन्हा सेवेत घ्या… कर्मचाऱ्यांची मागणी
महिला आणि बाल विकासात विभागात आयुक्त आणि कार्यक्रम व्यवस्थापक यांनी डिसेंबर महिन्यात घाईघाईने कर्मचारी भरती करून मर्जीतल्या व अननुभवी उमेदवारांना कामावर ठेवले. ही भरती रद्द करावी अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. ज्यांनी अगदी प्रत्येक वाडीवस्तीत, गल्लीत जाऊन उपेक्षित बालकांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या आणि बालकांच्या संरक्षण, पुनर्वसनाचे काम केले अशा कर्मचाऱयांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी हे कर्मचारी राज्य सरकारकडे दाद मागणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील, अशी अपेक्षा हे कर्मचारी व्यक्त करीत आहेत.