विद्यार्थी तयार असेल तेव्हाच परीक्षा घ्यावी! ‘यूजीसी’ समितीची सरकारला शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना भविष्यात अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षेचे टेन्शन घेण्याची गरज कदाचित राहणार नाही. कारण विद्यार्थी परीक्षेला तयार असेल तेव्हाच आणि त्यांच्या मागणीनुसार परीक्षा घ्यावी अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) समितीने केंद्र सरकारकडे केली आहे.

पुणे येथील भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू एम. एम. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली यूजीसीने मे 2018 मध्ये ही समिती नेमली होती. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. या समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला नुकताच सादर केला. विद्यार्थी परीक्षेला सामोरा जाण्यास तयार असेल तेव्हाच त्याची परीक्षा घेण्यात यावी आणि विद्यार्थ्याची तयारी ही सर्वस्वी त्याच्यावरच अवलंबून असते, शिक्षणसंस्थेवर नाही असे या समितीने या अहवालात म्हटले आहे. अशा पद्धतीने ‘ऑन-डिमांड’ परीक्षा घेतल्यास परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळता येतील आणि नापास होण्याचे प्रमाणही कमी होईल असे समितीने म्हटले आहे.

संकल्पना चांगली पण अंमलबजावणी कठीण

यूजीसीच्या समितीच्या या शिफारशीबद्दल शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहे. प्राध्यापकवर्गाने ही संकल्पना चांगली असली तरी अंमलबजावणीसाठी कठीण असल्याचे म्हटले आहे. परीक्षा या अनेक विषयांच्या आणि अनेक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे ही संकल्पना प्रत्येक परीक्षेसाठी राबवता येईल की नाही याबद्दल शंकाच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘आयडॉल’पासून सुरुवात करणार

‘ऑन-डिमांड’ परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षण मंडळाची स्थापना करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. तसेच हा प्रयोग आधी दूरस्थ व मुक्त अध्ययन केंद्रांमधील (आयडॉल) अभ्यासक्रमांसाठी सुरू करावा आणि नंतर तो इतर अभ्यासक्रमांना लागू करावा. तसेच अशा परीक्षांना वयाचे आणि पात्रतेचे बंधन नसावे, असेही समितीने नमूद केले आहे.