
कश्मीरमधील नौशेरा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र जवान संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिवावर मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप यांचे भाऊ सागर यांनी त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. यावेळी ‘अमर रहे अमर रहे… संदीप सावंत अमर रहे’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. पोलीस आणि लष्कराकडून बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी शहीद जवान संदीप सावंत यांची गावातून बुधवारी पहाटे नौशेरा सेक्टरमधील एका जंगलातून काही दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करीत असल्याचे जवानांना समजले. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत संदीप सावंत आणि अर्जुन थापा मगर शहीद झाले.
शहीद जवान संदीप सावंत यांचे पार्थिव जम्मू कश्मीरहून पुण्याला आणण्यात आले. त्यानंतर पार्थिव कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव मूळ गाव मुंढे येथे अंत्यदर्शनासाठी आणले गेले.
सकाळी आठ वाजता संदीप सावंत यांचे पार्थिव कराडमधील विजय दिवस चौकात आल्यानंतर, छत्रपती शिवाजी स्मारक, शाहू चौक, कोल्हापूर नाका, गोटे येथील नवीन बसस्टॉप, मुंढे येथील मराठी शाळा, मुंढे ग्रामपंचायत आणि चव्हाणमळा या मार्गे अंत्ययात्रा शहीद संदीप सावंत यांच्या निवासस्थानी पोहोचली. तेथे शहीद संदीप सावंत यांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. दुपारी बाराच्या सुमारास शहीद सावंत यांचे पार्थिव विजयनगरनजीक असलेल्या सावंत यांच्या शेतात आणण्यात आले. तेथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिमुकलीला पाहून अश्रू अनावर
अवघे 25 वर्षे वय असलेल्या शहीद संदीप सावंत यांना दीड महिन्याची मुलगी आहे. या चिमुकलीला पाहून अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या चिमुकलीच्या बारशासाठी संदीप नुकतेच घरी येऊन गेले होते. तीच त्यांची कुटुंबीयांशी शेवटची भेट ठरली.






























































